देशात अनेक घटना घडत असतात. अशीच एक अजब-गजब घटना आता समोर आली आहे. "माझ्या रात्री वाया जात आहेत, माझ्यासाठी आधी नवरी आणा" असं एका शिक्षकाने म्हटलं आहे. मध्य प्रदेशच्या सतना येथील सरकारी शाळेतील शिक्षकाला इलेक्शन ड्यूटीचं ट्रेनिंग होतं. पण तो त्यात सहभागी झाला नाही. त्याने सहभागी न होण्याचे कारण देत सरकारला पत्र लिहिलं आहे. आता सरकारने या शिक्षकाला निलंबित केलं आहे.
अखिलेश कुमार मिश्रा असे या 35 वर्षीय शिक्षकाचं नाव आहे. भोपाळपासून सुमारे 450 किमी अंतरावर असलेल्या सतना जिल्ह्यातील अमरपाटन येथे शिक्षक राहतो. तो महुदर उच्च माध्यमिक विद्यालयात संस्कृतचा शिक्षक आहे. 16-17 ऑक्टोबर रोजी इलेक्शन ड्यूटी ट्रेनिंग होतं. जे शिक्षकाने घेतलं नाही. 27 ऑक्टोबर रोजी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून राष्ट्राच्या महत्त्वाच्या कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल त्याला निलंबित का करू नये, याचे स्पष्टीकरण द्या असं सांगितलं.
शिक्षकाने उत्तर देत पत्र लिहिलं आहे. जे सध्या जोरदार व्हायरल होत आहे. "माझं संपूर्ण आयुष्य माझ्या पत्नीशिवाय व्यतीत होत आहे, माझ्या रात्री वाया जात आहेत. आधी माझं लग्न करून द्या. 3.5 लाख रुपयांचा हुंडा (रोख किंवा खात्यात) आणि 'सिंगरौली टॉवर किंवा समद्रिया, रीवा' येथील फ्लॅटसाठी कर्ज मंजूर करून हवं.काय करू? माझ्याकडे शब्द नाहीत, तुम्ही ज्ञानाचा सागर आहात" असं म्हटलं आहे.
सतनाचे जिल्हाधिकारी अनुराग वर्मा यांनी शिक्षकाला दोन नोव्हेंबर रोजी निलंबित केलं. मिश्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. लोकांनी सांगितलं की तो फोन वापरत नाही. त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की, तो काही वर्षांपासून तणावाखाली होता. नाहीतर एवढं विचित्र पत्र कोण लिहितं, तेही कारणे दाखवा नोटीसला उत्तर म्हणून? वर्षभरापूर्वी त्याने मोबाईल वापरणं बंद केलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.