देहराडून - नुकत्याच झालेल्या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला होता. त्यात उत्तराखंडमध्ये स्पष्ट बहुमतासह सत्ता कायम राखत भाजपाने नवा इतिहास रचला होता. मात्र उत्तराखंडचे विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी पराभूत झाल्याने, आता भाजपा मुख्यमंत्री म्हणून कुणाची निवड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या आठवडाभरापासून त्यावर भाजपाच्या अंतर्गत गोटात खल सुरू होता. या सर्व घडामोडींनंतर अखेर मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आले.
नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी झालेल्या भाजपाच्या आमदारांच्या बैठकीत पुष्कर सिंह धामी यांची भाजपाच्या विधिमंडळ सदस्यांच्या नेतेपदी निव़ड करण्यात आली. यावेळी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून राजनाथ सिंह आणि मीनाक्षी लेखी आणि निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी उपस्थित होते.
यावेळी या निर्णयाची घोषणा करताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की, पुष्कर सिंह धामी यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंड वेगाने प्रगती करेल , असा मला विश्वास आहे.
उत्तराखंडमधील विधानसभेच्या ७० जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. तर १० मार्च रोजी निकाल जाहीर झाले. यामध्ये ७० पैकी ४७ जागा जिंकत दोन तृतियांश बहुमतासह भाजपाने पुन्हा एकदा सत्ता मिळवली. मात्र पुष्कर सिंह धामी पराभूत झाले होते.