हरीश गुप्ता नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर ऊर्फ पी. के. यांच्या बहुप्रतीक्षित काँग्रेस प्रवेशाला विलंब होताना दिसत आहे. प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशाला ग्रीन सिग्नल देण्याऐवजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याबाबत अजून विचार करू इच्छितात. लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी सोनिया गांधी यांनी अधिकार असलेला कृती गट (ईएजी) - २०२४ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ईएजीच्या सदस्यांची नावेही आज रोखण्यात आली. राजस्थानातील उदयपूर येथे १३ मेपासून तीन दिवसांचे चिंतन शिबिर होत असून, या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
साहजिकच, सोनिया गांधी यांना या विषयावर व्यापक विचारविनिमय करायचा असल्याने काँग्रेसने पीके यांच्या प्रवेशाची घोषणा पुढे ढकलली आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, सोनिया गांधी या अतिशय सावधान, सतर्क राहून अंतिम निर्णय घेण्यापूर्वी व्यापक विचारविमर्श करतात. तथ्य हे आहे की, लोकसभा निवडणुकीसाठी ईएजीची स्थापना करण्यात आली आहे. प्रशांत किशोर यांच्या प्रवेशाबाबत योग्य वेळी ठोस निर्णय होईल.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी सोनिया गांधी यांनी पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय गटाची स्थापना केली आहे. गतवर्षीच्या अपुऱ्या राहिलेल्या चर्चेनंतर अलीकडच्या काळात गांधी कुटुंबीय आणि पीके यांच्यात अनेकदा चर्चा झाली आहे. समितीने याबाबतचा आपला अहवाल सोनिया गांधी यांना सोमवारी सोपविला. पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांना सांगितले की, ईएजीची स्थापना करण्यात आली आहे. नव संकल्पासाठी उदयपूर येथे चिंतन शिबिर होत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या समर्थकांसह पक्षात असे अनेक जण आहेत ज्यांनी पीके यांना महत्त्वाचे स्थान देण्यास विरोध केला आहे. कारण, ते स्थिर निष्ठा नसलेले व्यक्ती आहेत. त्याऐवजी पीके यांच्यासोबत काम करण्याची व्यवस्था असावी, असाही सल्ला या नेत्यांनी दिला आहे.
पीके करणार टीआरएससाठी काम?
हैदराबाद : तेलंगणातील सत्तारूढ टीआरएसने रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या आय-पीएसी कंपनीसोबत (इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी) काम करण्याचा निर्णय घेतला आहे. टीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष आणि राज्यातील मंत्री के.टी. रामाराव यांनी याला दुजोरा दिला. तथापि, सूत्रांनी सांगितले की, किशोर यांनी यापूर्वीच आय-पीएसीपासून स्वत:ला वेगळे केले आहे. ही कंपनी देशातील अनेक पक्षांसोबत काम करते. प्रशांत किशोर यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा केली होती.