हैद्राबाद : तेलंगणामध्ये मतमोजणीत काँग्रेसची विजयी घोडदौड सुरू झाल्यानंतर रविवारी त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ए. रेवंथ रेड्डी यांची भेट घेऊन अभिनंदन करणारे राज्याचे पोलिस महासंचालक अंजनीकुमार यांना निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने निलंबित केले आहे.
ए. रेवंथ यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी अंजनीकुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून त्यांच्या समवेत गेलेल्या संजयकुमार जैन, महेश भागवत या दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी ही कडक कारवाई केली. तेलंगणातील विधानसभा निवडणूक रिंगणात असलेल्या २२९० उमेदवारांपैकी केवळ एका विशिष्ट उमेदवाराला पोलिस महासंचालक भेटले. हा उमेदवार एका राजकीय पक्षाचा स्टार प्रचारकही आहे. अशा व्यक्तीची मेहेरनजर होण्यासाठी पोलिस महासंचालकांनी ही भेट घेतली असे स्पष्ट संकेत मिळतात, असे सूत्रांनी सांगितले. तेलंगणात मतमोजणीचा काैल काँग्रेसच्या बाजूने जात असल्याचे दिसताच पोलिस महासंचालक अंजनीकुमार रेवंथ यांचे अभिनंदन करण्यास पोहोचले.
तर आमच्या पोलीस महासंचालकाना निलंबित केले असून आम्हा दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. त्याचे उत्तर त्वरित आम्ही आयोगाला दिले आहे. तसेच, पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार आम्ही होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमच्या सुरक्षेसाठी चर्चा करण्यास गेलो होत, असा खुलासा आयपीएस महेश भागवत यांनी केला आहे.