ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - केजरीवाल यांच्यावर लाचखोरीचे आरोप करणाऱ्या कपिल मिश्रा यांचे आज अखेर आम आदमी पक्षातून निलंबन करण्यात आले. दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर बंडाचा झेंडा रोवणाऱ्या कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांच्यावर दोन कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आपकडून मिश्रांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर आज संध्याकाळी आपच्या संसदीय समितीने मिश्रांवर कारवाई केली.
कपिल मिश्रा यांनी केलेल्या सनसनाटी आरोपांच्या पार्श्वभूमीवर आपच्या संसदीय समितीची आज संध्याकाळी बैठक झाली. या बैठकीत कपिल मिश्रा यांचे पक्षातून निलंबन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. मिश्रा यांचे निलंबन करण्यात आले असले तरी ते आपचे आमदार म्हणून पदावर कायम असतील. तसेच पक्षाने बजावलेला व्हीप त्यांच्यावर लागू असेल.
कपिल मिश्रा यांना शनिवारी मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर मिश्रांनी बंडाचा पवित्रा घेतला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहकारी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा सनसनाटी आरोप सरकारमधील बरखास्त करण्यात त्यांनी काल केला होता. त्यानंतर दिल्लीसह संपूर्ण देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
दरम्यान, कपिल मिश्रा यांनी आज दिल्लीतल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(ACB)ला केजरीवालांच्या 400 कोटींच्या टँकर घोटाळ्याचे पुरावे सुपूर्द केले. तसेच माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीला केजरीवाल जाणूनबुजून उशीर करत असल्याचा आरोपही मिश्रा यांनी केला.
एसीबीकडे पुरावे दिल्यानंतर त्यांनी केजरीवाल कशा प्रकारे चौकशीसाठी टाळाटाळ करत आहेत, हेही अधिका-यांना सांगितलं आहे. मिश्रा यांनी दावा केला आहे की, मंत्री नसतानाही याची चौकशी करून त्याचा अहवाल केजरीवालांना सुपूर्द केला होता. त्यावेळी मी टँकर घोटाळ्यात दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून चौकशी करण्याची शिफारस केली होती. मिश्रा म्हणाले, केजरीवाल आणि त्यांच्या दोन सहका-यांशी संबंधितही टँकर घोटाळ्यातसंदर्भात पुरावे दिले आहेत. या पुराव्यांवरून शीला दीक्षित यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
AAP PAC suspends Kapil Mishra from primary membership of the party (file pic) pic.twitter.com/ZqMOxh99ce— ANI (@ANI_news) May 8, 2017