ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - प्रसिध्द गायक सोनू निगमची हिंदी चित्रपटातील हिट गाणी विमान प्रवासात त्याच्याच आवाजातून ऐकायला मिळणे हा अनेक प्रवाशांसाठी सुखद धक्का होता. पण सोनू निगमची ही एअर कन्सर्ट जेट एअरवेजच्या क्रू ला चांगलीच महाग पडली आहे.
विमानातील प्रवाशांना सूचना देण्यासाठीचा माईक सोनू निगमला गायनासाठी वापरु दिल्याबद्दल जेट एअरवेजने पाच एअरहोस्टेसना निलंबित केले आहे. चार जानेवारीला जोधपूर ते मुंबई प्रवासा दरम्यान जेट एअरवेजच्या विमानात सोनू निगमचा हा गायनाचा कार्यक्रम झाला होता.
या विमानातील सर्व प्रवासी एकमेकांना ओळखत होते. त्यांनी सोनू निगमला गाण्याची विनंती केली. सोनूनेही त्यांच्या विनंतीला मान देऊन वीर झारामधील दो पल रुका आणि रिफ्यूजीमधील पंछी नदीया ही गाणी गायली. सोनू गात असताना विमानातील काही प्रवाशांनी त्यांच्याजवळ असणा-या मोबाईलमधून रेकॉर्डींग केले.
त्यानंतर काही प्रवाशांनी ही चित्रफीत सोशल मिडियावर पोस्ट केल्यानंतर व्हायरल झाली. त्यानंतर हवाई सुरक्षेचे नियमन करणा-या डीजीसीएने ही घटना गांर्भीयाने घेतली. डीजीसीएने या प्रकाराची चौकशी करुन जेट एअरवेजला विमानातील उदघोषणा व्यवस्था प्रवाशाला वापरु दिल्याबद्दल क्रू ला निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जेटने आपल्या पाच एअरहोस्टेसवर निलंबनाची कारवाई केली.