नवी दिल्ली - दिल्लीविद्यापीठाचे कुलगुरू योगेश त्यागी यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशान्वये निलंबन करण्यात आले आहे. दिल्ली विद्यापीठात दोन नियुक्त्यांवरुन वाद सुरू होता. याप्रकरणात कुलगुरुंची चौकशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी त्यांचे तत्काळ निलंबन केले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिल्ली विद्यापीठाच्या रजिस्टार यांना चिठ्ठी लिहून कुलगुरुंच्या चौकशीकाळात ते चौकशीप्रकरणावर दबाव टाकू शकतात, असे म्हटले आहे. त्यामुळे, पुढील आदेश येईपर्यंत त्यागी यांचे निलंबन करण्यात आल्याचे सांगत, प्राध्यापक पीसी जोशी यांच्याकडे सध्या प्रभारी कुलगुरुपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्याच आठवड्यात विद्यापीठातील दोन नियुक्त्यांवरुन चांगलाच वाद रंगला होता. त्यानंतर, शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रपतींना पत्र लिहून कुलगुरुंच्या चौकशीला परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यास, राष्ट्रपतींनी मंगळवारी मंजूरी दिली असून कुलगुरुंच्या चौकशीला परवानगी देण्यात आली आहे.