काही महिन्यांपूर्वी कर्नाटक राज्यातून भाजपाची सत्ता गेलेली असताना पुन्हा एकदा विधानसभेत दणका बसला आहे. विधानसभा अधिवेशनात मंजुर विधेयकाच्या प्रती फाडून उपाध्यक्षांवर भिरकावल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी भाजपाच्या दहा आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
कर्नाटक विधानसभेत बुधवारी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. भाजप आमदारांनी विधानसभेत प्रचंड गदारोळ केला आहे. विधानसभेत मंजुर केलेल्या विधेयकांच्या प्रती फाडून त्या उपाध्यक्ष रुद्रप्पा लमाणी यांच्याकडे फेकण्यात आल्या आहेत.
कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यूटी खादर यांनी बुधवारी 10 भाजप आमदारांना चुकीच्या वर्तनासाठी निलंबित केले आहे. यामध्ये सीएन अश्वथ नारायण, व्ही सुनील कुमार, आर अशोक, वेदव्यास कामत, यशपाल सुवर्णा, धीरज मुनिराजू, उमानाथ कोटीयन, अरविंद बेलाड, अरगा ज्ञानेंद्र आणि वाय भरत शेट्टी यांचा समावेश आहे.
विधानसभा अधिवेशनाचा आजचा दिवस सुरु होताच भाजपा आमदारांनी सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या विरोधकांच्या ‘युनायटेड वी स्टँड’ सभेसाठी काँग्रेस सरकारने आयएएस अधिकारी तैनात केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. हा सरकारी यंत्रणेचा गैरवापर असल्याचा आरोप करण्यात आला होता. या गदारोळात विधानसभा अध्यक्षांनी पाच विधेयके संमत केली होती.