राष्ट्रीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि खासदार बृजभूषण सिंह यांना अटक करा, अशी मागणी करत ऑलिंपिंक पदक विजेते आणि देशातील नामवंत कुस्तीपटू गेल्या १५ दिवसांपासून आंदोलनाला बसले आहेत. बृजभूषणसिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत महिला कुस्तीपटूंनी सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर, आता त्यांना अटक होईपर्यंत आपण इथून हलणार नाही, असा पवित्रा कुस्तीपटूंनी घेतला आहे. या कुस्तीपटूंना अनेक नेतेमंडळींनी भेटून आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तर, पोलिसांकडून बळाचा वापर करुन आमचं आंदोलन मोडण्यात येत असल्याचा आरोपही कुस्तीपटूंनी केला. आता, हरयाणातील तीन कुस्तीपटूंना हरयाणा कुस्ती संघाने निलंबित केल्याचे वृत्त आहे.
दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाल्याचा कारणास्तव, हरयाणा एम्येच्युर कुस्ती संघाने वीरेंद्र सिंग दलाल, संजयसिंग मलिक आणि जय भगवान या तिघांचे निलंबन केले आहे. HAWA चे अध्यक्ष रोहताश सिंग यांनी एक पत्र जारी करत या तिघांचे निलंबन केल्याचं समोर आलंय.
दिल्लीतील कुस्तीपटूंच्या आंदोलनास दिलेला पाठिंबा हा अनैतिक आहे. हे तिन्ही कुस्तीपटू अद्यापही आंदोलनात सहभागी आहेत. जे WFI व HAWA च्या नियमांचे, उद्दिष्टांचे उल्लंघन आहे, असे रोहताश सिंग यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे हरयाणा कुस्ती संघातील मतभेद समोर आले आहेत. कारण, कुस्ती संघाचे महासचिव राकेश सिंग यांनी हे निलंबन चुकीचं असल्याचं म्हटलंय. तसेच, HAWA च्या अध्यक्षांकडे या कुस्तीपटूंना निलंबित करण्याचा कुठलाही अधिकार नाही. तसेच, ज्या परिस्थिती या तिन्ही कुस्तीपटूंना निलंबित केले आहे, ते चुकीचे आणि अव्यवहार्य असल्याचे, राकेश सिंग यांनी म्हटलंय.