लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पॉक्सो कायद्यान्वये दाखल झालेल्या प्रकरणांसह अन्य काही खटल्यांचा अतिशय जलद निकाल देणाऱ्या एका अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशाला पाटणा उच्च न्यायालयाने निलंबित केले होते. त्या निकालाविरोधात या न्यायाधीशाने दाखल केलेली याचिका सुनावणीस घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. याप्रकरणी न्यायालयाने बिहार सरकारला नोटीस जारी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय लळीत व न्या. एस. आर. भट यांच्या खंडपीठासमोर बिहारमधील अरारिया येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत राय यांनी ही याचिका दाखल केली आहे.
त्या खटल्याचा निकाल चार दिवसांत दिला होता या याचिकेत राय यांनी म्हटले आहे की, सहा वर्षांच्या बालिकेवरील बलात्कार प्रकरणाच्या खटल्याचा मी एका दिवसात निकाल दिला. आणखी एका खटल्याचा चार दिवसांत निर्णय जाहीर केला. मी आरोपीला कारावासाची शिक्षा दिली. त्या खटल्याचा निकाल चार दिवसांत दिला होता. या निकालांचे बिहार सरकार व जनतेनेही कौतुक केले. मात्र, विशिष्ट यंत्रणेतील काही लोकांनी माझ्याबाबत पक्षपाती दृष्टिकोन बाळगला आहे. त्यातूनच ही कारवाई झाली.