नवी दिल्ली - भारतातून परदेशात जाणाऱ्या विमान उड्डाणांवरील स्थगिती पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (डीजीसीए) हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणं बंद असतील असं डीजीसीएने आपल्या निर्णयात म्हटलं आहे.
डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, "काही निवडक मार्गांवरच विशेष कारणासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सक्षम प्राधिकाऱ्यांच्यामार्फत परवानगी दिली जाऊ शकते. ताज्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक आणि त्यांच्यासाठी मंजूर असलेल्या उड्डाणांवर कोणताही परिणाम होणार नाही. आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 28 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे."
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे भारतात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय उड्डाणं 23 मार्चपासून बंद आहेत. मात्र मे महिन्यात "वंदे भारत" मोहिमे अंतर्गत विशेष विमान उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय जुलैपासून काही निवडक देशांसोबत एअर बबल करारानुसार उड्डाण केली जात आहेत.
भारताने जवळपास 24 देशांसोबत एअर बबल करार केला आहे. या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती, केनिया, भूतान, फ्रान्स यांसारख्या देशांचा समावेश आहे. एअर बबल करारानुसार भारताने प्रवासी उड्डाणांसाठी खास करार केला आहे. याला एअर बबल नाव देण्यात आलं आहे. याद्वारे संबंधित देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय एअरलाईन्स उड्डाणांचे संचलन करू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.