हैदराबाद : दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येवरून हैदराबाद विद्यापीठात सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन आणि वाढत्या दबावापुढे नतमस्तक होऊन विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने दिवंगत रोहितसह सर्व पाचही विद्यार्थ्यांचे निलंबन तत्काळ रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. तथापि, कुलगुरू अप्पा राव पोडिले यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा आणि हे आंदोलन आता देशव्यापी करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. दरम्यान, केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी केलेल्या कथित असत्य कथनाच्या निषेधार्थ विद्यापीठातील १३ दलित प्राध्यापकांनी प्रशासकीय पदांचा त्याग केला आहे.पाच विद्यार्थ्यांचे निलंबन तत्काळ मागे घेण्याचा निर्णय कार्यकारी परिषदेच्या तातडीने बोलावण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आणि हा निर्णय लगेच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना कळविण्यात आला असल्याचे विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले.स्मृती इराणी यांनी दिलेले स्पष्टीकरण असत्य व दिशाभूल करणारे आहे, असा आरोप करून हैदराबाद विद्यापीठातील एससी/एसटी टीचर्स अॅण्ड आॅफिसर्स फोरमच्या सदस्यांनी आपल्या ‘प्रशासकीय जबाबदारी’चा त्याग करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे हे आंदोलन देशभरात पसरविण्याचा इशारा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.‘विद्यापीठातील दलित विद्यार्थ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेणाऱ्या कार्यकारी परिषदेच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी एक वरिष्ठ दलित प्राध्यापक असल्याचे सांगून स्मृती इराणी यांनी सत्याचा विपर्यास केला आहे. वास्तविक विपिन श्रीवास्तव हे ‘सवर्ण जातीचे’ प्राध्यापक या उपसमितीचे अध्यक्ष होते,’ असे विद्यापीठाच्या दलित (एससी/एसटी) विभागाच्या सदस्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.‘हैदराबाद विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत एकाही दलित प्राध्यापकाचा समावेश नसणे ही दुर्दैवी बाब आहे. प्रमुख वॉर्डन हा दलित असणे हा योगायोग आहे आणि त्याने पाच विद्यार्थ्यांना (रोहितसह) निलंबित करण्याच्या वरून आलेल्या आदेशाचे केवळ पालन केले आहे. हा मुद्दा चिघळण्याला आणि रोहित वेमुलाच्या आत्महत्येला निश्चितच इराणी आणि केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय हेच जबाबदार आहेत,’ असेही दलित प्राध्यापकांच्या या फोरमने स्पष्ट केले.विद्यार्थ्यांचे निलंबन तत्काळ मागे घेण्याची आणि विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले गुन्हेही रद्द करण्याची मागणी करून या फोरमने विद्यार्थी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे. >अभाविपला हवी चौकशीरोहित वेमुला आत्महत्येची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी अभाविपचा नेता नंदनम कुमार याने केली आहे. रोहितला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल कुमारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेडकर स्टुडंटच्या सदस्यांनी व रोहितने आपल्यावर हल्ला केल्याचे आपण खोटे सांगितल्याचा कुमार याने इन्कार केला.>केजरीवालांचा इराणींवर हल्लाबोलदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी हैदराबाद येथे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. केंद्र सरकार जातीयवादी राजकारण खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. इराणींनी बुधवारी दिलेले निवेदन हे या मुद्याला जातीय मुद्दा बनविण्याच्या प्रयत्नाचाच एक भाग आहे आणि त्यासाठी त्यांनी माफी मागावी. रोहित अतिशय हुशार विद्यार्थी होता. तो दलित असला तरी राखीव कोट्यामधून आलेला नव्हता, तर गुणवत्तेवर त्याची निवड झाली होती. अशा हुशार विद्यार्थ्याने आत्महत्या करणे ही संपूर्ण देशासाठी आणि समाजासाठी शरमेची गोष्ट आहे, असे ते म्हणाले.>इराणी, दत्तात्रत यांना बडतर्फ करण्याची मागणीरोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बंडारू दत्तात्रय यांना तत्काळ मंत्रिपदावरून बडतर्फ करण्याची मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.इराणी या अभाविप नेत्याला वाचविण्यासाठी खोटे बोलत आहेत. चुकीची माहिती देऊन त्या देशाची दिशाभूल करीत आहेत. रोहितसह अन्य विद्यार्थ्यांवरील अन्यायाला त्या उचित ठरवित आहेत. खोटे बोलून त्यांनी अक्षम्य गुन्हा केला आहे. एक खोटे लपविण्यासाठी अनेकदा खोटे बोलल्या आहेत, असा आरोप सुरजेवाला यांनी केला.
‘त्या’ विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द; प्राध्यापकांचा पदत्याग
By admin | Published: January 22, 2016 3:46 AM