ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - डीडीसीएतील कथित भ्रष्टाचारावरुन आम आदमी पक्ष आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु असताना आता डीएएनआयसीएस केडरच्या दोन अधिका-यांच्या निलंबनावरुन केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.
केंद्र सरकारने गुरुवारी सकाळी डीएएनआयसीएस केडरच्या दोन अधिका-यांचे दिल्ली सरकारने केलेले निलंबन रद्द केले. मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेल्या फाईल्सवर स्वाक्षरी करायला नकार दिला म्हणून दिल्ली सरकारने बुधवारी डीएएनआयसीएस केडरच्या यशपाल गर्ग आणि सुभाष चंद्रा या दोन अधिका-यांना निलंबित केले होते.
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्ली सरकारच्या निर्णयाला बेकायद ठरवत निलंबनाची कारवाई रद्द केली. दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी निलंबनाच्या कारवाईचे समर्थन केल्यानंतर काहीवेळातच केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या अधिका-यांच्या निलंबनाचा निर्णय रद्द करण्यात आला.
या निलंबनाच्या कारवाई विरोधात तसेच राज्य आणि केंद्र सरकारमधील संघर्षामध्ये अधिकारी भरडले जात आहेत त्याविरोधात गुरुवारी दिल्लीतील २०० अधिकारी एकदिवसाच्या सामूहिक रजेवर गेले आहेत.