ऑनलाइन लोकमत
चंदीगढ, दि. २९ - भारत- पाकिस्तान सीमेवर कबूतराच्या माध्यमातून संदेशाचे अदान प्रदान करण्यात आल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. सीमेपासून चार किलोमीटर दूर असलेल्या बानियाल या पठानकोट जिल्ह्याच्या गावी एका गृहस्थाच्या घरावर एक कबुतर येऊन बसले. त्या व्यक्तीला त्या कबुतराच्या अंगावर काही उर्दू अक्षरे दिसली, त्यांनी तत्काळ ते कबूतर पकडले व या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. या कबुतराच्या अंगावर शकारगड व नरुवाल या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील जिल्ह्यांची नावे इंग्रजीत लिहीली होती. तसेच काही उर्दू शब्द व तिथले मोबाईल क्रमांक लिहीलेले अाढळल्याचे पोलिसांनी सांगितले. या कबुतराचे एक्स-रे काढण्यात आले असून संशयास्पद इतर कोणतीही गोष्ट अाढळली नसल्याचे बीएसफचे वरीष्ठ पोलीस अधीक्षक आर. के कौशल यांनी सांगितले. हा प्रकार अतशिय गंभीर असून या प्रकरणाची माहिती आम्ही गुप्तचर संघटनांना दिल्याचे कौशल यांनी सांगितले.
या प्रकरणी बीएसएफचे जलंधर येथील डिआयजी आर. एस. कटारीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या कबुतराची वरिष्ठ अधिका-यांनी पाहणी केली असून त्यात संशयास्पद काही नाही. तसेच असे प्रकार याआधीही घडले आहेत, ते कबुतर आम्ही पक्षी तज्ञांकडे पाठवून दिले आहे असेही कटारीया यांनी सांगितले.