नवी दिल्ली : एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) कंपनीकडे त्याचा अहवाल मागितला आहे. पीडित वृद्ध महिला प्रवाशाने टाटा समूहाच्या अध्यक्षांकडे तक्रार केल्यानंतर, विमान कंपनीने दिल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपास पूर्ण होईपर्यंत आरोपीला विमान प्रवास करण्यास बंदी घातली आहे.
ही घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली होती. बिझनेस श्रेणीतून प्रवास करणाऱ्या एका मद्यधुंद पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशावर लघुशंका केली होती. विमानात उजेड कमी होता. त्यावेळी आरोपी प्रवासी महिलेवर लघुशंका करत असल्याचे काहीजणांना जाणवले. इतर प्रवाशांनी त्याला दुसरीकडे जायला सांगेपर्यंत तो तिथून हटला नाही. दिल्ली पोलिसांनी बुधवारी विकृत प्रवाशावर गुन्हा नोंदवला आणि त्याला पकडण्यासाठी अनेक पथके तयार केली आहेत. तर, या घटनेत निष्काळजीपणा दाखविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे एअर इंडियाने म्हटले आहे.
काय म्हटले महिलेने?महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, क्रू मेंबर्सने तिला दुसरीकडे बसायला जागा दिली. मात्र, काही वेळाने पुन्हा आपल्या जागेवर बसायला सांगितले. ती जागा चादरींनी झाकली होती. परंतु, तेथे दुर्गंधी येत होती. त्यामुळे तिने तिथे बसण्यास नकार • दिला. ती अडून राहिल्यावर अखेर दुसरी जागा दिली. विशेष म्हणजे, बिझनेस श्रेणीत त्यावेळी अनेक जागा रिक्त होत्या.