हरीश गुप्ता नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीची तीव्रता कमी झाली असताना केरळ व महाराष्ट्रामध्ये मात्र मृतांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत या दोन राज्यांमध्ये मृतांचे प्रमाण सर्वाधिक असून, त्याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. राज्ये मृतांची संख्या लपवत असावेत, अशी तज्ज्ञांना शंका आहे.कोरोनामुळे डिसेंबर व जानेवारी महिन्यात देशामध्ये २६,३०३ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी केरळमध्ये १३,८६० मृत्यू झाले. उर्वरित १२,४४३ जणांचा मृत्यू अन्य राज्यांत झाला. केरळपाठोपाठ महाराष्ट्रामध्ये डिसेंबर, जानेवारी महिन्यात १५७५ जण कोरोनामुळे मरण पावले. महाराष्ट्रात ३१ जानेवारीपर्यंत कोरोनामृतांची एकूण संख्या एक लाख ४२ हजार ५७२ झाली.
डिसेंबर, जानेवारीमध्ये कोरोनामुळे दिल्लीत ७३०, उत्तर प्रदेशात ३७९, गुजरातमध्ये ३४५ जण मरण पावले. ओमायक्रॉनची तीव्र लाट असतानाही देशात मृतांचे प्रमाण कमी होते. मात्र आता साथीचा जोर कमी असताना डिसेंबर व जानेवारीमध्ये देशात २६ हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली. डिसेंबरमध्ये १२,०७६ जण मरण पावले, तर जानेवारीत १४,२२७ जणांनी जीव गमावला.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेशएखादी व्यक्ती कोरोनामुळे मरण पावली असा उल्लेख मृत्यू प्रमाणपत्रात नसला तरी पुरेशी कागदपत्रे सादर करण्यात आली तर मृताच्या वारसदाराला ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. कोरोना चाचणी केल्यानंतर एक महिन्याच्या आत झालेला मृत्यू हा या संसर्गाने झालेला मृत्यू म्हणून गृहीत धरावा, असा निकष ठरविण्यात आला.