भाजपचे नेते शुभेंदु अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. नुकत्याच झालेल्या एका राजकीय ममता बॅनर्जी यांनी धमकावल्याचा आरोप करत शुभेंदु अधिकारी यांनी तक्रार दाखल केली आहे. यावेळी, शुभेंद्र अधिकारी यांनी सांगितले की, जेव्हापासून त्यांनी आपला राजकीय मार्ग बदलला आहे, तेव्हापासून त्यांना अनेक बनावट प्रकरणांचा सामना करावा लागला आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी टीएमसीने आमच्या राजकीय पक्षाच्या सदस्यांविरुद्ध सतत द्वेषाचा प्रचार केला आहे, असे शुभेंदु अधिकारी म्हणाले.
खोट्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली टीएमसी नेत्यांना अटक करण्यात केंद्रीय एजन्सीच्या कथित गैरवापराला उत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी भाजपला हा कडक इशारा दिला होता. "जर केंद्रीय एजन्सींनी आमच्या चार नेत्यांना अटक केली, तर राज्य पोलीस भाजपच्या आठ नेत्यांना खुनाच्या आरोपाखाली अटक करतील आणि तुरुंगात पाठवतील, अशा इशारा ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी नेताजी इनडोअर स्टेडियममधील एका भाषणात दिला होता. तसेच, भाजपचे सरकार आणखी तीन महिने कायम राहील, असाही दावा ममता बॅनर्जी यांनी केला होता.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी केलेले विधान प्रक्षोभक करणारे आणि गुन्हेगारीची धमकी देणारे असल्याचे भाजपचे नेते शुभेंदु अधिकारी यांनी म्हटले आहे. अशा प्रकारची विधाने केवळ निराधार नाहीत तर संबंधित कलमांतर्गत गंभीर परिणाम देखील होऊ शकतात, असेही ते म्हणाले. तसेच, 182 (खोटी माहिती), 194 (खोटे पुरावे), 195A (धमकी देणे) यासह आयपीसीच्या विविध कलमांचे संभाव्य उल्लंघनाचा हवाला देत ममता बॅनर्जी आणि घटनेत सहभागी असलेल्या इतरांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचे आवाहन शुभेंदु अधिकारी यांनी केले.
याशिवाय, ममता बॅनर्जी यांच्या विरोधात कलम 211, 203, 505 (II) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून टीएमसीचे नेते अडचणीत सापडले आहेत. काही नेत्यांची ईडी चौकशी सुरू आहेत. यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, टीएमसी नेते पार्थ चॅटर्जी, जीवन कृष्णा साहा, माणिक भट्टाचार्य, अनुब्रता मंडल आणि ज्योती प्रिया मल्लिक हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत.