सुवेंदू अधिकारी ममतांना अजून एक धक्का देणार, तृणमूलमधील हे नेते भाजपात दाखल होणार
By बाळकृष्ण परब | Published: December 31, 2020 09:17 AM2020-12-31T09:17:27+5:302020-12-31T09:19:37+5:30
Suvendu Adhikari News : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसा राज्यातील राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे.
कोलकाता - पश्चिम बंगालमधील मोठा जनाधार असलेल्या नेत्यांपैकी एक असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश करून ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जींना अजून एक दणका देण्याच्या तयारीत असून, सुवेंदू यांचे वडील आणि दोन भाऊ लवकरच भाजपामध्ये दाखल होणार आहेत. सुवेंदू यांचे वडील आणि एक भाऊ हे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसा राज्यातील राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे. बरेच दिवस नाराज असलेले तृणमूल काँग्रेसमधील नेते सुवेंदू अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी ममतांची साथ सोडत भाजपामध्ये प्रवेश केला होता. आता त्यांचे संपूर्ण कुटुंब भाजपावासी होण्याच्या तयारीत आहे. मात्र अद्याप त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही. पण सुवेंदू अधिकारी यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुवेंदू यांचे वडील आणि तृणमूलचे खासदार शिशिर अधिकारी आणि भाऊ खासदार दिव्येंदू अधिकारी तसेच तृणमूलचे नेते असलेले धाकटे भाऊ सौमेंदू अधिकारी लवकरच भाजपावासी होणार आहेत. काही दिवसांपूर्वी मिदनापूर जिल्ह्यात झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या सभेला अधिकारी कुटुंबातील कुणीही उपस्थित नव्हते.
दरम्यान, सुवेंदू अधिकारी यांच्या बंडानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांचे भाऊ सौमेंदू अधिकारी यांच्यावर कारवाई करत त्यांना पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील कांथी नगरपालिकेच्या प्रशासक बोर्डावरून हटवले होते. गेल्या दोन महिन्यांपासून सौमेंदू अधिकारी हे सुवेंदू अधिकारी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमांना मदत करत असल्याचा आरोप तृणमूलच्या स्थानिक नेत्यांनी केला होता. सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबामागे मोठा जनाधार असून, सुमारे ४० विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते.