बुलंदशहर - उत्तर प्रदेश सरकारकडून महात्मा गांधींचा अपमान केल्याचं उघडकीस आलं आहे. येथील स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयातील टाईल्सवर चक्क महात्मा गांधींचा फोटो असल्याचे दिसून येत आहे. तसेच राज्यातील विविध गावांत बांधण्यात आलेल्या शौचालयतील या टाईल्सवर भारताचे राष्ट्रीय चिन्हदेखील होते. गावकऱ्यांनी या शौचालयाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
ग्रामसेवकाच्या आदेशावरुन शौचालयात या टाईल्स बसविण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आम्ही तक्रार केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसारच या टाईल्स बसविण्यात आल्याचे आम्हाला सांगण्यात आले, असे तेथील गावकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याबाबत जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, बुलंदशहरच्या इच्छावरी या गावात अशा प्रकारचे 13 शौचालय बांधण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या 13 शौचालयातील टाईल्सवर भारताचे राष्ट्रीय चिन्ह असल्याचे दिसत आहे.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बुलंदशहरमध्ये जवळपास 508 शौचालय बांधण्यात आले आहेत. त्यापैकी 13 शौचालयातील भिंतींवर बसविण्यात आलेल्या टाईल्सवर महात्मा गांधी आणि अशोक चक्र यांच्या प्रतिमा आहेत. याप्रकरणी आम्ही एक चौकशी पथक नेमले असून या शौचालयातील सर्वच टाईल्स काढून टाकण्यात आल्याचे बुलंदशहचे जिल्हाधिकारी अमरजीत सिंह यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात चौकशीनंतर संबंधित ग्रामविकास अधिकारी संतोष कुमार यांना निलंबित करण्यात आले असून ग्रामसेवक सावित्री देवी यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच सावित्री देवी यांच्याकडील सर्वच सरकारी खात्यांची जप्ती करण्यात आली आहे.