संयुक्त राष्ट्रे : काश्मीर सैन्यमुक्त करण्याची नाहीतर पाकिस्तानला दहशतवादमुक्त करण्याची खरी गरज आहे, अशा सडेतोड शब्दांत खोऱ्यातील सैन्य हटविण्याची पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची मागणी भारताने गुरुवारी फेटाळून लावली. त्याचबरोबर पीओकेचा (पाकव्याप्त काश्मीर) अवैध ताबा पाकने लवकर सोडावा, असेही सुनावले. पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेतील आपल्या भाषणात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर थोड्याच वेळात दिल्लीहून भारताची तीव्र प्रतिक्रिया आली. शरीफ यांनी त्यांच्या भाषणात काश्मीर मुद्दा न सुटण्यास संयुक्त राष्ट्राचे अपयश संबोधले. त्याचबरोबर भारतासोबत शांततेसाठी ‘शांतता पुढाकार’ या चतु:सूत्रीचा प्रस्ताव ठेवला. या चतु:सूत्रीत काश्मीर सैन्यमुक्त करण्याच्या मागणीचा समावेश आहे. काश्मीर सैन्यमुक्त करणे हे उत्तर नाहीतर पाकिस्तान दहशतवादमुक्त करणे हे खरे उत्तर आहे. पाक हा दहशतवादाचा नाहीतर तो स्वत:च्या धोरणाचा मुख्य पीडित आहे, असे धारदार प्रत्युत्तर भारताचे परराष्ट्र सचिव विकास स्वरुप यांनी दिले. टष्ट्वीटमालिकेतून त्यांनी शरीफ यांच्या भाषणाची प्रचंड चिरफाड केली. पाक दहशतवादाचा मुख्य पीडित असल्याच्या शरीफ यांच्या वक्तव्याचा दुसऱ्या एका भारतीय अधिकाऱ्याने समाचार घेतला. पाकच दहशतवादाचा मुख्य पोशिंदा असून तो सरकारी धोरणाचे वैध शस्त्र म्हणून त्याचा वापर करतो, असे हा अधिकारी म्हणाला.संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी अभिषेक सिंह यांनी आमसभेदरम्यान उत्तर देण्याच्या भारताच्या अधिकाराचा वापर करताना म्हटले की, वस्तुस्थिती ही आहे की, तो (पाकिस्तान) दहशतवादाचे पालनपोषण करण्याच्या स्वत:च्या धोरणाचा बळी ठरला आहे. दहशतवादाचा उपयोग सरकारी धोरणाचे वैध शस्त्र म्हणून वापर करणारा देश याच्या केंद्रस्थानी आहे.याशिवाय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी टिष्ट्वटच्या मालिकेतून प्रत्युत्तर देताना म्हटले की, काश्मिरातून सैन्य काढून घेतल्यानंतर नाही तर पाकने दहशतवादाला मूठमाती दिल्याने तोडगा निघेल. त्यांनी टिष्ट्वटरवर असेही लिहिले, दहशतवाद्यांचे पालनपोषण केल्यामुळे पाकिस्तानात अस्थिरता निर्माण झाली असून, स्वत: निर्माण केलेल्या भस्मासुराचे शेजाऱ्यांवर खापर फोडणे हे समस्येवरील उत्तर नाही.(वृत्तसंस्था)‘पॅलेस्टिनी आणि काश्मिरी लोक परदेशींच्या ताब्याने पीडित असल्याच्या शरीफ यांच्या या टिपणीवर तिरकस प्रतिक्रिया व्यक्त करताना स्वरूप म्हणाले की, पाकिस्तानी पंतप्रधानांचे परदेशी ताब्याचे वक्तव्य अगदी बरोबर आहे; परंतु ताबा करणाऱ्यांची नावे त्यांनी चुकीची सांगितली. पाकने पाकव्याप्त काश्मीर लवकरात लवकर रिकामा करावा, असे आवाहन आम्ही करतो. शरीफ यांनी जगभरातील मुस्लीम पीडित असल्याचे मत मांडताना काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी केली होती. पॅलेस्टीनी आणि काश्मिरी परदेशी ताब्याने पीडित असल्याचे ते म्हणाले होते. त्यावर जोरदार हल्ला चढविताना अभिषेक सिंग यांनी अवैध ताबा करणारा पाकिस्तान असल्याचे सांगून भारत प्रलंबित मुद्द्यांवर पाकशी दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त वातावरणात चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले.
‘गिळलेले’ काश्मीर आधी सोडा!
By admin | Published: October 02, 2015 4:19 AM