ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - मक्का मशिद बॉम्ब स्फोट प्रकरणात मागच्या सातवर्षांपासून तुरुंगात बंद असलेल्या स्वामी असिमानंद यांची आज सुटका होऊ शकते. हैदराबाद न्यायालयाने गुरुवारी असीमानंद यांचा जामिन मंजूर केला. राष्ट्रीय तपास यंत्रणेला असीमानंद यांच्या जामिनाच्या आदेशाची प्रत शुक्रवारी मिळेल. त्यानंतर एनआयए जामिनाला आव्हान द्यायचे किंवा नाही त्यावर निर्णय घेईल.
2007 सालच्या समझौता ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने असीमानंद यांच्या जामिनाला विरोध केला नव्हता. या प्रकरणातही असीमानंद मुख्य आरोपी होते. ऑगस्ट 2014 मध्ये पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाकडून त्यांना जामिन मंजूर झाला होता. असीमानंद हे अभिनव भारत या संघटनेचे सदस्य आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला अजमेर दर्गा बॉम्ब स्फोट प्रकरणातही जयपूर न्यायालयाने त्यांची सुटका झाली. त्यामुळे मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणात जामिन मंजूर होणे हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा आहे. अजमेर स्फोट प्रकरणात असीमानंद यांची सुटका करण्याच्या जयपूर न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अभ्यास सुरु असून, एनआयए यासंबंधी कायदेशीर सल्ला घेऊ शकते असे सूत्रांनी सांगितले.