ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - समझौता एख्सप्रेस बॉम्बस्फोटाचे सूत्रधार स्वामी असीमानंद यांच्या जामीनाला आव्हान न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र सरकारच्या या भूमिकेचा फटका भारतालाच बसण्याची चिन्हे असून पाककडून हा मुद्दा उपस्थित केला जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाचे सूत्रधार स्वामी असीमानंद यांना हरियाणा हायकोर्टाने ऑगस्ट २०१४ मध्ये सशर्त जामीन मंजूर केला आहे. भाजपाच्या लीगल सेलचे प्रमुख सत्यपाल जैन यांनी असीमानंद यांचे वकिल म्हणून बाजू मांडली होती. असीमानंद यांच्या जामीनाला सुप्रीम कोर्टात आव्हान द्यायचे की नाही यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अभ्यास केला. अखेरीस असीमानंद यांच्या जामीनाला आव्हान देण्याची आवश्यकता नाही असे एनआयएने म्हटले आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
भारत व पाकिस्तानमध्ये लवकरच चर्चा सुरु होणार असून या चर्चेत भारताकडून झकीऊर रहमान लख्वीच्या जामीनाचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. आता पाकनेही स्वामी असीमानंदांच्या जामीनाचा मुद्दा उपस्थित करण्याची तयारी केल्याचे समजते.