नवी दिल्ली - हिंदू दहशतवाद ही थिअरी समझोता एक्सप्रेस बॉम्बब्लास्ट प्रकरणातून निर्दोष सुटल्यामुळे नष्ट झाली असल्याची प्रतिक्रिया स्वामी असीमानंद यांनी दिली आहे. एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत स्वामी असीमानंद यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. मी मूळचा पश्चिम बंगालमधील आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात धर्मांतरण केलं जात होतं अशा वातावरणात मी हिंदुत्त्वाबद्दल जागरुकता करण्याचं काम केलं. अनेक लोकांच्या धर्मपरिवर्तनाला विरोध केला त्यामुळे मला खोट्या प्रकरणात अडकवून तत्कालीन सरकारने फसविण्याचे काम केले असा आरोप असीमानंद यांनी केला आहे.
समझोता एक्सप्रेस ब्लास्ट प्रकरणात पोलीस चौकशी करत असताना मी कुठेही फरार झालो नव्हतो. जर मला लपायचे होते तर मी मोबाईल सुरु का ठेवला असता? मी तेव्हा आश्रमात होतो. मला हिंदू दहशतवादाचे प्रतिक बनवलं गेले. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2010 रोजी हरिद्वार येथून अटक करण्यात आली आणि माझ्यावर समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाचा खोटा आरोप लावण्यात आल्याचं स्वामी असीमानंद यांनी सांगितले.
या मुलाखतीत बोलताना स्वामी असीमानंद म्हणाले की, पोलिसांनी मी अटकेत असताना अनेक अत्याचार केले. मी गुन्हा कबूल करावा यासाठी माझा छळ करण्यात आला. या छळानंतरही मी हरलो नाही. मात्र त्यांनी माझ्या कुटुंबीयांना, आईला-भावाला आणून त्यांचाही छळ करण्याची धमकी दिली तेव्हा मी तुम्ही सांगाल तसे करायला तयार असल्याच सांगत गुन्हा कबूल केला. माझ्या कुटुंबीयांना कोणताही त्रास होऊ नये यासाठीच मी गुन्हा कबूल केला. मात्र कोर्टासमोर हे सिद्ध झालं की माझ्यावर जबरदस्ती करुन खोटा गुन्हा कबूल करुन घेतला आहे. त्यामुळे कोर्टाने मला निर्दोष सिद्ध केलं.
साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीचे समर्थन करताना स्वामी असीमानंद यांनी ज्या पद्धतीने मागील सरकारने खोट्या आरोपाखाली आम्हाला फसवून आमच्यावर अत्याचार केले. पण कोर्टाने आम्हाला न्याय दिला. हे सगळे जनतेला माहीत आहे. हिंदू दहशतवाद ही थिअरी खोट्या आरोपाखाली पसरविण्यात आली. त्याचे उत्तर जनता देईल. मलादेखील निवडणूक लढवण्याची ऑफर दिली तर मी निवडणूक लढवेन हे स्वामी असीमानंद यांनी स्पष्ट केलं.