अयोध्या - देशातील बहुचर्चित अयोध्येतील राम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना कधी होणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर समोर आले आहे. येत्या जानेवारी २०२४ च्या तिसऱ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतील अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख सदस्य आणि व्यवस्थापक यांनी दिली आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, मंदिराचे बांधकाम जोरात सुरू आहे. 'जानेवारी २०२४ च्या तिसऱ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम लल्ला (बाल भगवान राम) यांच्या मूर्तीची मूळ जागी प्रतिष्ठापना केली जाईल असं त्यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
मंदिराचा निवडणुकीशी संबंध नाही'मंदिराचे बांधकाम आणि २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांचा संबंध नाही. आम्ही फक्त आमचे काम करत आहोत. रामललाची मूर्ती मंदिरात स्थापित करण्यापूर्वी बराच काळ कापडी पंडालमध्ये ठेवण्यात आली होती. मात्र आता देवतांना त्यांच्या मूळ जागेवर हलवण्याची वेळ आली आहे असं सांगत गोविंद देव गिरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मूर्ती बसवल्यानंतरही काम सुरू राहणारमूर्तीची मूळ जागेवर प्रतिष्ठापना केल्यानंतरही मंदिराचे काम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. गर्भगृह, पहिल्या मजल्यावरील काम पूर्ण करून जानेवारी २०२४ पूर्वी दर्शनाची व्यवस्था करण्याचे आमचे ध्येय आहे असं सांगत जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. योग, आयुर्वेद आणि भारतीय संगीत जगभर पोहोचले असून जगभरात सांस्कृतिक क्रांती होणार आहे असंही गोविंद देव गिरी यांनी म्हटलं.
२०१९ मध्ये सुप्रीम कोर्टानं दिला होता निकालसुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी अयोध्येत १६व्या शतकातील बाबरी मशीद ज्या ठिकाणी उभी होती आणि कारसेवकांनी ती पाडली त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यास परवानगी दिली. कोर्टाने याच निकालात सरकारला बाबरी मशिदीच्या जागी मशीद बांधण्यासाठी अयोध्येत पाच एकरांचा मुख्य आणि योग्य भूखंड देण्यास सांगितले होते.