राजकोट: गुजरातच्या भूजमधल्या स्वामी नारायण मंदिराचे स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांनी महिलांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वयंपाक करणाऱ्या महिलांबद्दल कृष्णस्वरुप यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. मासिक पाळीच्या काळात एखाद्या महिलेनं पतीसाठी स्वयंपाक केल्यास तिला पुढचा जन्म कुत्रीचा मिळेल. तर अशा महिलेच्या हातचं खाणारा पुरुष पुढल्या जन्मी बैल होईल, असं कृष्णस्वरुप म्हणाले. स्वामी कृष्णस्वरुप दासजी भूजमधल्या स्वामीनारायण मंदिराचे उपदेशक आहेत. त्यांनी त्यांच्या अनुयायांना गुजराती भाषेत संबोधित केलं. 'मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलेनं स्वयंपाक केल्यास ती पुढल्या जन्मी कुत्री होईल. तर अशा महिलेच्या हातचं जेवणाऱ्याला पुढील जन्म बैलाचा मिळेल,' असं स्वामी कृष्णस्वरुप प्रवचन देताना म्हणाले. अहमदाबाद मिररनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मासिक पाळी आलेल्या महिलांनी तयार केलेलं अन्न खाणं टाळा, असं आवाहन त्यांनी पुरुषांना केलं. 'तुम्ही अशा महिलांच्या हातचं खात असाल, तर त्याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात. कारण शास्त्रात याबद्दल अगदी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. लग्नाच्या आधीपासून तुम्हाला या गोष्टींची कल्पना असायला हवी,' असंदेखील ते पुढे म्हणाले. 'मी याआधी तुम्हाला कधी याबद्दल सांगितलंय का याची मला माहिती नाही. मी १० वर्षांत पहिल्यांदाच अशा प्रकारचा सल्ला देत आहे. आपल्या धर्मातल्या काही गोष्टींबद्दल बोलू नका, असं काही संत मला सांगतात. मात्र मी याबद्दल बोललोच नाही, तर लोकांना समजणार कसं,' असं स्वामी कृष्णस्वरुप यांनी म्हटलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वामीनारायण भूज मंदिराचे विश्वस्त यादवजी गोरसिया यांना स्वामी कृष्णस्वरुप यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल प्रतिक्रिया विचारण्यात आली. मात्र त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. मंदिराचे खनिजदार देवप्रकाश स्वामी यांनादेखील याबद्दल विचारण्यात आलं. मात्र कृष्णस्वरुप यांच्या वक्तव्याची आपल्याला कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं.
'मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणारी पुढील जन्मात कुत्री होईल'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 3:49 PM
स्वामी नारायण मंदिराचे स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांचं वादग्रस्त विधान
ठळक मुद्देभूजमधल्या स्वामी नारायण मंदिराचे स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांच्या विधानानं वादमासिक पाळी आलेल्या महिलांच्या हातचं न जेवण्याचा पुरुषांना सल्लास्वामी कृष्णस्वरुप दासजी यांच्या विधानावर बोलण्यास मंदिराच्या विश्वस्तांचा नकार