लखनऊ: अयोध्येतील राम मंदिरासाठी संत-महंत आक्रमक झाले आहेत. 5 डिसेंबरपर्यंत राम मंदिराच्या उभारणीची घोषणा करा. अन्यथा 6 डिसेंबरला आत्मदहन करेन, असा इशारा अयोध्येचे महंत परमहंस महाराज दास यांनी दिला आहे. ते भदोही जिल्ह्यातील सीतामढी येथे बोलत होते. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे राम मंदिराची उभारणी रेंगाळल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. सरकारनं 5 डिसेंबरपर्यंत राम मंदिराच्या उभारणीची घोषणा करावी. अन्यथा सीतामढीतील मातीचा लेप लावून मी चितेवर बसेन आणि आत्मदहन करेन, असा इशारा परमहंस महाराज दास यांनी दिला. संघ, भाजपा आणि विश्व हिंदू परिषदेच्या कूटनितीमुळेच अयोध्येत राम मंदिराची उभारणी होत नाही, असा आरोप दास यांनी केला. राम मंदिराची उभारणी होत नसल्यानं सीतामढीमध्ये 'धिक्कार सभे'चं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला संबोधित करताना परमहंस महाराज यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली. सीतामढीच्या वाल्मिकी आश्रमात धिक्कार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत परमहंस महाराज यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. 'सीतेच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सीतामढीची माती घेऊन जाण्यास मी आलो आहे. सरकारनं 5 डिसेंबरपर्यंत राम मंदिराच्या उभारणीची घोषणा न केल्यास 6 डिसेंबरला मी सीतामर्ढीच्या मातीचा लेप लावून आत्मदहन करेन,' असं परमहंस महाराज यांनी म्हटलं.
'5 डिसेंबरपर्यंत राम मंदिर उभारणीची घोषणा करा, अन्यथा 6 डिसेंबरला आत्मदहन'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 3:36 PM