नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील नेते स्वामी प्रसाद मौर्य हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पार्टीतून बाहेर पडल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपला नवा पक्ष काढला आहे. देशाची राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये एका कार्यक्रमादरम्यान स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे.
'राष्ट्रीय शोषित समाज पार्टी' असे स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या पक्षाचे नाव दिले आहे. दरम्यान, या कार्यक्रमात स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा राम मंदिराबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच, भाजपावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपा धर्माच्या नावावर धूळफेक करत आहे. भाजपा तुम्हाला महत्त्वाच्या मुद्द्यापासून फिरवत आहे, भाजपाला धर्म आणि राम मंदिराच्या नावाखाली मते मिळवायची आहेत. श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा हा ढोंगीपणा आणि फसवणूक आहे, असे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले.
भाजपा रामाच्या नावाखाली लूट करत आहे. जो सर्वांना जन्म देणारा आहे. त्यांची पंतप्रधान मोदी प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी गेले. मग काय, राम निष्प्राण होते का? असा सवाल करत हे देवालाही फसवू शकतात. हा रामाचा हा अपमान आहे, असे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले. याचबरोबर, संविधानाच्या व्यवस्थेत फेरफार केला जात असून, देशाचे संविधान धोक्यात आली आहे. कोणतीही जाहिरात न देता नोकऱ्या दिल्या जात आहेत. जनतेची फसवणूक केली जात आहे, असे स्वामी प्रसाद मौर्य यांनी सांगितले.
तरुण बेरोजगार होत आहेत. महागाईमुळे कंबरडे मोडत आहे, भाजपा सरकारने फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना शत्रूसारखी वागणूक दिली जात आहे. सरकारी संपत्ती उद्योगपतींना दिली आहे, असे सांगत कांशीराम यांना सम्राट अशोकाच्या स्वप्नांचा भारत घडवायचा होता, त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कोणतीही जोखीम पत्करू, असे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले. तसेच, शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, दुप्पट लाभाचे आश्वासन देणारे सरकार आज एमएसपीच्या मागणीवरून लाठीचार्ज करत आहे.