लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊ लागले आहेत. आतापर्यंत 403 विधानसभा जागांच्या सुरूवातीच्याकलांमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपा पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. अशा स्थितीत नुकतेच भाजपा सोडून समाजवादी पार्टीत दाखल झालेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीपूर्वी भाजपा सोडून समाजवादी पार्टीमध्ये दाखल झालेले स्वामी प्रसाद मौर्य निवडणुकीत फाजिलनगरमधून पराभूत झाले आहेत. हा पराभव स्वामी प्रसाद मौर्य आणि समाजवादी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपाचे सुरेंद्र कुशवाह यांनी या जागेवरून विजय मिळवला आहे. सुरेंद्र कुशवाह यांनी येथे 26 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.
अशा परिस्थितीत ट्विट करून सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, "मी निवडणूक हरलो, हिम्मत नाही. संघर्षाची मोहीम सुरूच राहणार आहे." दरम्यान, स्वामी प्रसाद मौर्य यांच्या निवडणुकीपूर्वीच्या वक्तव्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. भाजपा सोडताच स्वामी प्रसाद मौर्य यांनी स्वत:चे मुंगूस असे वर्णन केले होते. नाग रुपी आरएसएस आणि साप रुपी भाजपाला स्वामी रुपी मुंगूस उत्तर प्रदेशातून संपवूनच श्वास घेईल, असे स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटले होते.
तब्बल 40 वर्षांची राजकीय कारकीर्द स्वामी प्रसाद मौर्य हे पाच टर्म आमदार असून त्यांची राजकीय कारकीर्द तब्बल 40 वर्षांची आहे. सन 2016 पर्यंत ते मायवतींसोबत बसपाचा चेहरा म्हणून होते. 2017 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा विधानसभेत निवडून गेले. स्वामी प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेशमधील मागास समाजाचा मोठा चेहरा समजले जातात. त्यामुळे त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. मात्र, स्वामी प्रसाद मौर्य यांनी 11 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर त्यांनी भाजपाला देखील रामराम ठोकला होता.