नवी दिल्ली: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले होते. गेल्या १५ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. विद्यार्थ्यांचा वाढता विरोधत पाहता प्रशासनाने फीवाढीचा निर्णय (बुधवारी) मागे घेतला होता. मात्र आंदोलन दरम्यान स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाची विटंबना केली असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे स्मारकाच्या बाजूला भाजपा विरोधात अपशब्द लिहण्यात आले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार कोणी केला आहे यासंबंधी पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून हॉस्टेलच्या नियमात बदल यासोबतच फी वाढ, विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयांना टाळे लावल्याविरोधात विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत होते. तसेच विद्यार्थ्यांना ड्रेस कोडचे देखील निर्बंध लादल्याने विद्यार्थ्यांकडून विरोध करण्यात येत होता. यानंतर जेएनयूच्या विद्यार्थी कार्यकारी समितीने फी वाढीचा निर्णय मागे घेतला असल्याची घोषणा करण्यात आली होती.
फी दरवाढीविरोधात जेएनयूमधील सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आल्या होत्या. हॉस्टेलच्या भाड्यामध्ये वाढ करुन ते ६०० रुपये करण्यात आले होते. तसेच मेसच्या सुरक्षा शुल्कात वाढत करत ते १२ हजार रुपये करण्यात आले होते. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याला १७०० रुपये अतिरिक्त सेवा शुल्क विद्यार्थ्यांना देण्यास सांगितले होते. याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते.