नवी दिल्ली: अलीकडेच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींचे निकाल हाती आले. यापैकी चार राज्यांत भाजपने प्रचंड मोठे यश मिळवल्याचे पाहायला मिळाले. या चार राज्यांत भाजपने सत्ता कायम राहिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या प्रगतीचा आलेख उंचावल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपद सोडतील आणि त्यांच्या जागी भाजपची प्रमुख व्यक्ती त्या पदावर बसेल. ती व्यक्ती आणि पंतप्रधान मोदी कधी पद सोडतील, यांसारख्या मुद्द्यांवर भाकित वर्तवण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशमधील निवडणुकीनंतर महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी पंतप्रधान मोदींबद्दल भविष्यवाणी केली आहे. राष्ट्रवादाच्या नावावर पंतप्रधान मोदी स्वत: पंतप्रधानपद सोडतील आणि ही जबाबदारी एखाद्या योग्य व्यक्तीकडे सोपवतील, असे सूचक वक्तव्य महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी केले आहे. महामंडलेश्वरर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी केलेल्या दाव्यानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या आधारे भविष्यवाणी केल्यास १२ वर्ष नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी कायम राहतील. १२ वर्ष हे पद भूषवल्यानंतर मोदी दिल्लीच्या राजकारणापासून दूर जातील, असे महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी म्हटले आहे.
योगी आदित्यनाथ हे मोदीनंतर पंतप्रधान होतील
महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी केलेल्या भाकितानुसार, योगी आदित्यनाथ नरेंद्र मोदीनंतर पंतप्रधान होतील असे सांगितले आहे. नरेंद्र मोदी स्वत: राजकारणामधून संन्यास घेतील. या माध्यमातून ते एक आदर्श सर्वांसमोर ठेवतील ज्यामधून ते राजकीय इतिहास घडवतील. उत्तर प्रदेशमधील महोबामध्ये स्वजन शिष्य संम्मेलनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी हे भाकित वर्तवले आहे.
नरेंद्र मोदी दोन वर्षांमध्ये राजकीय संन्यास घेतील
नरेंद्र मोदी मे २०१४ पासून भारताचे पंतप्रधान आहेत. सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भारतीयांना मोदींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजप आणि मित्र पक्षांच्या बाजूने कौल देत त्यांना दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी दिली. महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांच्या भाकितानुसार, सन २०२४ च्या निवडणुकीनंतरही पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा विराजमान होतील. मात्र, दोन वर्षांमध्ये म्हणजेच २०२६ मध्ये राजकीय संन्यास घेतील, असा दावा गिरी यांनी केला.
दरम्यान, पंतप्रधान मोदींचा १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर योगी आदित्यनाथ हे दिल्लीची गादी संभाळतील. योगींनी पंतप्रधान होऊन हिंदू राष्ट्रवादाचे स्वप्न पूर्ण करावे, अशी इच्छा गिरी यांनी व्यक्त केली आहे. सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकून योगी आदित्यनाथ यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भविष्यामध्ये योगी हेच पंतप्रधान होतील अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू असल्याचे सांगितले जात आहे.