नवी दिल्ली : भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यानंतर आता मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) अरविंद सुब्रमण्यन यांना लक्ष्य ठरवत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वादात उडी घेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अरविंद सुब्रमण्यन यांच्यावर पूर्ण विश्वास दर्शवत त्यांचा सल्ला सरकारसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान ठरत असल्याचे स्पष्ट केल्यामुळे सरकारमधील अंतर्गत कलह समोर आला आहे. सुब्रमण्यन यांच्यावर सरकारचा पूर्ण विश्वास असल्याचे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनीही स्पष्ट केले आहे.राजन यांच्या संभाव्य वारसदारांच्या स्पर्धेत टॉप फेव्हरिट म्हणून अरविंद सुब्रमण्यन यांचे नाव समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर स्वामी यांनी केलेला शाब्दिक हल्ला राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकन औषध कंपन्यांचे हित स्वारस्य जपण्यास अमेरिकेने भारताविरुद्ध कारवाई करावी अशी भूमिका अमेरिकन काँग्रेससमक्ष १३ मार्च २०१३ रोजी कुणी मांडली? काँग्रेसने जीएसटीसंबंधी तरतुदींवर कठोर भूमिका घ्यावी यासाठी कुणी खतपाणी घातले. अंदाज बांधा. ते हेच वॉशिंग्टन डीसीचे अरविंद सुब्रमण्यन आहेत, असे स्वामी यांनी बुधवारी जारी केलेल्या टिष्ट्वट मालिकेत म्हटले आहे. सुब्रमण्यन यांनी अमेरिकेत दिलेली साक्ष एक भारतीय म्हणून की अमेरिकन नागरिक म्हणून दिली? हे कुणाला माहीत आहे काय? असा सवालही त्यांनी केला. (वृत्तसंस्था)स्वामी यांचे ते वैयक्तिक मत असून ते पक्षाचे मत ठरत नाही. भाजप किंवा सरकारने त्याबाबत कोणतेही विधान केलेले नाही. लोकशाहीत तुम्ही प्रत्येकाला वादात ओढू शकत नाही. - एम. वेंकय्या नायडू, केंद्रीय नगरविकास मंत्री.नियुक्ती योग्यच : बौद्धिक संपदा अधिकारासारख्या काही महत्त्वाच्या मुद्यांवर अरविंद सुब्रमण्यन यांची भूमिका अर्थमंत्रालयाला माहिती होती. स्वामी यांनी सुब्रमण्यम यांच्याबद्दल केलेल्या विधानाला आम्ही महत्त्व देत नाही, असे अर्थ खात्याच्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले. आॅक्टोबर २०१४ मध्ये सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत काम केलेल्या सुब्रमण्यन यांची मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती केली.भाजपाने हात झटकले मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांच्यावर स्वामी यांनी केलेल्या टीकेशी भाजप सहमत नसून ते पूर्णत: त्यांचे वैयक्तिक मत ठरते, असे भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी स्पष्ट केले. जेटली हेच स्वामींचे खरे लक्ष्य - दिग्विजयसिंगसुब्रमण्यम स्वामी यांचे खरे लक्ष्य अरविंद सुब्रमण्यन नव्हे तर अर्थमंत्री अरुण जेटली हेच असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अर्थमंत्रालय स्वामींच्या सुपूर्द करण्याची योजना आहे काय? - दिग्विजयसिंग, काँग्रेसचे सरचिटणीस
स्वामींचे लक्ष्य आता सीईए अरविंद सुब्रमण्यन
By admin | Published: June 23, 2016 1:39 AM