शाहजहांपूर (उत्तर प्रदेश) : जेव्हा एखाद्या पक्षासोबत अन्य पक्ष येतात (दल के साथ ‘दल-दल’), तेव्हा अधिक ‘दलदली’मुळे कमळ चांगले खुलते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे विरोधकांचा समाचार घेतला.येथे ‘किसान रॅली’त बोलताना मोदी म्हणाले की, केंद्रात ऐतिहासिक जनादेश देऊन जनतेने जे सरकार स्थापन केले आहे, त्यावर विरोधी पक्षांचा विश्वास नाही. संसदेत आम्ही सातत्याने विचारत होतो की, अविश्वास प्रस्तावाचे कारण काय आहे? जेव्हा कारण सांगू शकले नाहीत, तेव्हा गळ्यात पडले. आम्ही त्यांना हेच सांगत होतो की, लोकशाहीत जनादेश सर्वात श्रेष्ठ आहे. जनतेच्या मनाविरुद्ध असा खेळ खेळणे योग्य नाही.विरोधी पक्षांना असे वाटत होते की, आपण मोदींना धडा शिकवायला हवा, त्यांना पदावरून दूर करायला हवे, पण देशातील सव्वाशे कोटी लोकांच्या ताकदीमुळे, त्यांच्या विश्वासामुळेच आपण पंतप्रधानपदी आहोत, हे विरोधक विसरून गेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेची ही ताकद आहे. साखर कारखान्यांना १ डिसेंबरपासून उसापासून केवळ साखरच नव्हे, इथेनॉल, रस आणि मोलॅसिसची निर्मिती करण्याची परवानगी देण्याचे आमच्या सरकारने ठरविले आहे, असेही मोदी यांनी सांगितले.ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. दलालांना दूर करून शेतकºयांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य किंमत दिली जात आहे. खरेदीत पारर्शकता आणली आहे. आज शेतकºयांच्या नावाने जे अश्रू ढाळत आहेत, त्यांनाही कधी काळी शेतकºयांसाठी काही करण्याची संधी होती, तेव्हा काहीच केले नाही, हे शेतकºयांना माहीत आहे. या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.पैसा योग्य ठिकाणीकाँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की, पूर्वी काँग्रेसच्या एका पंतप्रधानांनी असे म्हटले होते की, दिल्लीहून एक रुपया निघतो तेव्हा गावात जाईपर्यंत १५ पैसे उरतात.तेव्हा पंचायतींपासून ते संसदेपर्यंत त्यांचीच सत्ता होती. मात्र, आम्ही यावर तोडगा काढला आणि आज ९० हजार कोटी रुपये योग्य व्यक्तीच्या खात्यात जात आहेत. पूर्वी ते दुसरीकडेच जात होते.
दलदल वाढली की कमळ चांगले खुलते- मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 1:40 AM