नवी दिल्ली : एकेकाळी ज्यांचा संन्याशी न बनण्याचा दिलेला सल्ला शिरसावंद्य मानून सार्वजनिक जीवनाकडे पर्यायाने राजकारणाकडे वळणारे व पुढील वाटचालीत पंतप्रधानपदापर्यंत मजल गाठणारे नरेंद्र मोदी दिलेला शब्द पाळत ९ मे रोजी ९५ वर्षीय गुरू स्वामी आत्मस्थानंद यांची भेट घेणार आहेत. कोलकात्याजवळील रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठाचे प्रमुख असलेले आत्मस्थानंद आजारी असून फेब्रुवारीपासून रुग्णालयात आहेत.मोदी हे दोन दिवसांच्या कोलकाता भेटीवर जात असून शहरात प्रवेश करताच ते बेलूर मठाला किंवा रुग्णालयाला भेट देऊन स्वामी आत्मस्थानंद यांच्या प्रकृतीची विचारपूस करतील असे सांगितले जात आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी २०१३ मध्ये बेलूर मठाला भेट दिली होती. त्यावेळी स्वामींच्या पायाशी बसत बराच वेळ चर्चा केल्यानंतर मोदींनी त्यांना पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले होते. आत्मस्थानंद यांचे प्रकृतीस्वास्थ्य पाहता मोदी लवकरच त्यांना भेटणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)