नवी दिल्ली - कोरोना संकटात इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल दरांसंदर्भात अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या अपेक्षेवर पार पाणी फेरले गेले आहे. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. याच मुद्द्यावर आता भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. स्वामी यांनी हा निशाणा साधताना थेट प्रभू रामचंद्र, माता सीता आणि रावणाचा उल्लेख केला आहे.
सुब्रमण्यम स्वामी, हे भाजपचे खासदार आहेत. असे असतानाही त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधताना, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीची तुलना थेट श्रीराम, रावण आणि माता सीता यांच्या जन्मस्थळांसोबतच केली आहे. प्रभू श्री रामांच्या भारतात पेट्रोलचे दर सर्वाधिक असल्याचे दाखवत, शेजारील नेपाळ आणि श्रीलंकेत ते दर अत्यंत कमी असल्याचे स्वामींनी म्हटले आहे.
'कृषी सेस लावल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठलिही वाढ नाही'
सुब्रमन्यम स्वामींनी केलं असं ट्विट -रामाच्या भारतात पेट्रोलचा दर 93 रुपये प्रति लिटर, सीतेच्या नेपाळमध्ये पेट्रोलचा दर 53 रुपये प्रति लिटर, तर रावणाच्या लंकेत पेट्रोलचा दर 51 रुपये प्रति लिटर, असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. त्यांनी यापूर्वीही पेट्रोल दर वाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
'कृषी सेसमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठलिही वाढ नाही' - सध्या मुंबईत पेट्रोल 92.86 आणि डिझेल 83.30 रुपयांना लीटर आहे. यावर हा सेस लागणार नसून तो कंपन्यांच्या ब्रँडेड पेट्रोल आणि डिझेलवर लागणार आहे. यामुळे हा सेस कंपन्यांना द्यावा लागणार आहे. या दरवाढीचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार नाही, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. सोशल मीडियावर आणि काही पोर्टलने वृत्त दिले होते, की पेट्रोल व डिझेलच्या किंमती 2.5 ते 4 रुपयांनी वाढणार आहेत. मात्र, जावडेकर यांनी हे वृत्त फेटाळले आहे. तसेच, केवळ टॅक्सला पुन्हा नियोजित करण्यात आले आहे, सरकारने एक्साईज कमी केला असून कृषी सेस नव्याने सुरू केला आहे. त्यामुळे, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होणार नाही, ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे, असे जावडेकर यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.