नवी दिल्ली : परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांना भेटताना आपादमस्तक शरीर झाकत केलेला पेहराव सध्या सोशल मीडियावर टीकेचा विषय बनला असून टिष्ट्वटर आणि अन्य माध्यमांतूनही नेटकऱ्यांनी जोरदार आगपाखड चालविली आहे. इराणमध्ये महिलांना बुरख्यासह संपूर्ण शरीर झाकूनच बाहेर पडावे लागते. स्वराज यांनी गुलाबी साडी आणि डोक्यावर त्याच रंगाची शाल ओढली होती. डोक्यापासून तर पायापर्यंत त्यांचे संपूर्ण शरीर झाकलेले दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. विशेषत: टिष्ट्वटरवर संतप्त प्रतिक्रियांचा पाऊस पडला. स्वराज यांनी डोके झाकून रौहानी यांची भेट घेणे योग्य नसल्याच्या काहिशा मवाळ तर काही टीकेच्या भडिमार करणाऱ्या आॅनलाईन प्रतिक्रिया चर्चेचा विषय बनल्या आहेत. ‘द मिनिस्टर इज विअरिंग ए पिंक पोटॅटो सॅक’ असे लिहिलेले एक टिष्ट्वट नंतर वगळण्यात आले. इराणमधील महिलांना संपूर्ण शरीर झाकण्याचे कायदेशीर बंधन आहे. काही प्रतिष्ठित महिलांनी केलेला विरोधाचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
स्वराज यांच्या ‘इराणी लूक’वरून आगपाखड
By admin | Published: April 20, 2016 3:01 AM