नवी दिल्ली - लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, तसेच चौकशीला तो सहकार्य़ करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आशिष मिश्राची (Ashish Mishra) 12 तास चौकशी करण्यात आली. यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याच दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. "नेतागिरी म्हणजे फॉर्च्यूनरने कोणालाही चिरडून टाकणे नाही" असं स्वतंत्र देव सिंह (BJP Swatantra Dev Singh) यांनी म्हटलं आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह हे अल्पसंख्यांक आघाडीच्या कार्यकारिणीत बोलत होते. "नेतेगिरी म्हणजे कोणालाही लुटणे नाही. फॉर्च्युनरने कुणालाही चिरडायला आलेलो नाही. तुम्हाला तुमच्या वर्तनामुळेच मते मिळतील. तुम्ही राहता त्या परिसरात जर दहा लोकांनी तुमची स्तुती केली तर माझी छाती रुंद होईल" असं म्हटलं आहे. तसेच "लोकांचे प्रेम तुम्हाला नेता बनवते. आम्ही राजकारणात लुबाडण्यासाठी किंवा कुणालाही फॉर्च्यूनरने चिरडण्यासाठी आलेलो नाही. फक्त तुमच्या वागण्याने मते मिळणार आहेत" असा सल्ला देखील स्वतंत्र देव सिंह यांनी दिला आहे.
काही महिन्यांपूर्वी अजय मिश्रा टेनी यांनी कारबाबत महत्त्वाची कबुली दिली आहे. "शेतकऱ्यांना चिरडणारी ती कार आमचीच" असल्याचं म्हटलं आहे. "पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतोय की शेतकऱ्यांना चिरडणारी ती थार कार आमची आहे. ती आमच्या नावाने नोंदणीकृत आहे. ही कार काही कार्यकर्त्यांना घेऊन कोणाला तरी आणण्यासाठी जात होती. त्यावेळी माझा मुलगा दुसऱ्या ठिकाणी होता. तो सकाळी अकरा ते संध्याकाळपर्यंत दुसऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करत होता. माझा मुलगा आशिष मिश्रा घटनास्थळी नाही तर कार्यक्रमस्थळी उपस्थित होता, तिथे हजारो लोक होते. त्याचे तिथले फोटो आणि व्हिडीओ देखील आहेत. जर तुम्हाला त्याचा कॉल रेकॉर्ड आणि सीडीआर, लोकेशन जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही सर्व काही तपासू शकता. हजारो लोक आशिष मिश्रा कार्यक्रमात होते, असा जबाब देण्यास तयार आहेत" असं अजय मिश्रा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं आहे.
"हे लोक शेतकऱ्यांमध्ये लपलेले अतिरेकी"
"वाहनाबाबत बोलायचे झाले तर माझा ड्रायव्हर या हिंसाचारात ठार झाला आहे, तसेच दोन कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाला, तर एक कार्यकर्ता या घटनेत बचावला आहे. आणखी तीन जण जखमी झाले आहेत. त्यानंतर कार तिथेच थांबली. काही वेळाने कारला धक्का देण्यात आला आणि थारसह आणखी एक फॉर्च्युनर पेटवून देण्यात आली. हे लोक शेतकरी असूच शकत नाहीत. हे लोक शेतकऱ्यांमध्ये लपलेले अतिरेकी आहेत" असं देखील अजय मिश्रा यांनी म्हटलं आहे. तसेच "आपला मुलगा आशिष मिश्रा लखीमपूर खिरी येथे झालेल्या भीषण हिंसाचाराच्या ठिकाणी असल्याचं सिद्ध करणारे कोणतेही पुरावे समोर आले तर मी आपल्या पदाचा राजीनामा देईन" असं आता अजय मिश्रा टेनी यांनी याआधी म्हटलं आहे.