स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या मारहाण प्रकरणी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. केजरीवाल यांच्या मौनावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला असून आम आदमी पक्षाचे लोक राज्यसभा खासदाराला घरी बोलावून मारहाण करत असल्याचा आरोप केला आहे. मालीवाल प्रकरण घडवण्याचा भाजपाचा कट असल्याच्या आरोपालाही नड्डा यांनी प्रत्युत्तर दिलं. जर भाजपाने षडयंत्र रचलं असेल तर केजरीवालांनी लखनौमध्ये माईक का बाजूला ढकलला असा सवाल विचारला आहे.
लखनौमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी मालीवाल यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर माईक बाजुला ढकलला होता. जेपी नड्डा म्हणाले की, आम आदमी पार्टीची स्थापना असत्याच्या आधारे झाली आहे. दिल्लीतील जनतेसमोर केजरीवाल उघड पडले आहेत. स्वाती मालीवाल यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हल्ला झाला, तेव्हा मुख्यमंत्री यावर गप्प का बसले आहेत, असा सवाल त्यांनी केला.
"केजरीवालांचा पर्दाफाश झाला"
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जेपी नड्डी यांना विचारण्यात आले की, आम आदमी पक्षाचा आरोप आहे की, स्वाती मालीवाल यांना भाजपाने केजरीवाल यांना अडकवण्यासाठी पाठवले होते. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, "आप हा असत्यावर उभा असलेला पक्ष आहे आणि त्याची विश्वासार्हता शून्य नाही, मायनसमध्ये आहे."
"आज अरविंद केजरीवाल हे देशातील जनतेसमोर आणि दिल्लीतील जनतेसमोर उघडे पडले आहेत, त्यांचा सर्व प्रकारे पर्दाफाश झाला आहे. जर हे षड्यंत्र भाजपाने रचले असेल तर तुम्ही इकडून तिकडे माईक का ढकलत आहात? (लखनौमध्ये पीसी दरम्यान)?" तुम्ही गप्प का आहात? तुम्हाला कोण नेमकं कोण थांबवत आहे?
"कोणत्याही थराला जाऊन आरोप करू शकतात"
"आम आदमी पार्टीची संस्कृती दर्शवते की ते लोकांना त्यांच्या घरी बोलावतात आणि त्यांना मारहाण करतात. आम्ही त्यांच्याशी (स्वाती मालीवाल) किंवा आमच्या पक्षातील कोणाशीही बोललो नाही. आम्ही अशाप्रकारे काम करत नाही. आम्ही खूप सरळ आहोत. आता त्यांची चोरी पकडली गेली आहे. त्यांच्याकडे आणि त्यांच्या पक्षाकडे विश्वासार्हता नाही, ते कोणत्याही थराला जाऊन आरोप करू शकतात" असं जेपी नड्डी यांनी म्हटलं आहे.