आम आदमी पार्टीच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तन आणि मारहाणीप्रकरणी भाजपा आता आक्रमक झाली आहे. याच दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधताना ते या प्रकरणावर मौन का बाळगत आहेत, असा सवाल केला आहे.
भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या की, "स्वाती मालीवाल यांना मारहाण झाली त्यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्या व्यतिरिक्त कुटुंबातील सदस्य आणि कर्मचारी यापैकी कोण उपस्थित होते, ही माहिती केवळ स्वाती मालीवाल आणि अरविंद केजरीवाल देऊ शकतात. "
स्मृती इराणी यांनी अनेक प्रश्न देखील विचारले आहेत, "मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत स्वाती मालीवाल यांना मारहाण का करण्यात आली? केजरीवाल अद्याप या प्रकरणी स्पष्टपणे का बोलले नाहीत? याचं उत्तर अद्याप लोकांना मिळालेलं नाही" असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
आपचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांनी बुधवारी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांना या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी आहे. "मला आशा आहे की निष्पक्ष चौकशी होईल. न्याय मिळाला पाहिजे. निःपक्षपातीपणे चौकशी करून न्याय मिळावा" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
स्वाती मालीवाल यांचा गंभीर आरोप
स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार प्रकरणात गंभीर आरोप केला आहे. "काल पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की, प्रत्येकावर कसा खूप जास्त दबाव आहे, स्वातीच्या विरोधात वाईट बोलायचं आहे, तिचे पर्सनल फोटो लीक करून तिचं खच्चीकरण करायचं आहे" असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून स्वाती यांनी याबाबत पोस्ट केली आहे.
"जो कोणी तिला पाठिंबा देईल त्याला पक्षातून काढून टाकलं जाईल, असं म्हटलं जात आहे. कुणाला पत्रकार परिषद घेण्याची तर कुणाला ट्विट करण्याचं काम मिळालं आहे. अमेरिकेत बसलेल्या स्वयंसेवकांना फोन करून माझ्याविरुद्ध काहीतरी पुरावे शोधणं हे कुणाला तरी काम दिलं आहे. काही बनावट स्टिंग ऑपरेशन तयार करणे हे आरोपीच्या जवळच्या काही बीट रिपोर्टर्सचं काम आहे. तुम्ही हजारोंची फौज उभी करा, मी एकटी याला सामोरी जाईन कारण सत्य माझ्या पाठीशी आहे" असं स्वाती यांनी म्हटलं आहे.