आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक केली आहे. नुकतेच काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. यामध्ये मालिवाल या पोलिसांनाच अरेरावी करताना, नोकरी घालविण्याची धमकी देताना व आरामात चालताना दिसत आहेत. यामुळे एकूणच या प्रकरणाभोवती संशयाचे ढग निर्माण होऊ लागले आहेत. मालिवाल यांनी गंभीर आरोप केल्याने दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून विभव कुमार यांचा शोध घेतला जात होता. आज ते केजरीवाल यांच्या निवासस्थानी सापडले. दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री निवासस्थानातून आठ सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. तसेच अतिरिक्त डीसीपी आणि एसीपी यांच्यासह दिल्ली पोलिसांची टीम मालिवाल यांना घेऊन तिथे गेली होती. तिथे त्यांनी सीन रिक्रीएट केला.
दुपारी बाराच्या सुमारास विभव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर त्यांना सिव्हील लाईन्स पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात विभव यांचे वकीलही गेले आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांना आतमध्ये येण्यास मज्जाव केला आहे. यावेळी वकील आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली आहे.
पोलिस कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, असा सवाल करत विभव यांचे वकील संजीव यांनी आपण १५ ते २० मिनिटांपासून पोलिस ठाण्याबाहेर उभे आहोत पोलीस आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाहीत, असा आरोप केला आहे. अद्याप पोलिसांनी एफआयआरची कॉपीही दिली नसल्याचे म्हटले आहे. कोणत्याही सुचनेशिवाय पोलिसांनी विभव यांना अटक केल्याचा आरोप वकिलांनी केला आहे.