आम आदमी पार्टीच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार प्रकरणात गंभीर आरोप केला आहे. "काल पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की, प्रत्येकावर कसा खूप जास्त दबाव आहे, स्वातीच्या विरोधात वाईट बोलायचं आहे, तिचे पर्सनल फोटो लीक करून तिचं खच्चीकरण करायचं आहे" असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून स्वाती यांनी याबाबत पोस्ट केली आहे.
"जो कोणी तिला पाठिंबा देईल त्याला पक्षातून काढून टाकलं जाईल, असं म्हटलं जात आहे. कुणाला पत्रकार परिषद घेण्याची तर कुणाला ट्विट करण्याचं काम मिळालं आहे. अमेरिकेत बसलेल्या स्वयंसेवकांना फोन करून माझ्याविरुद्ध काहीतरी पुरावे शोधणं हे कुणाला तरी काम दिलं आहे. काही बनावट स्टिंग ऑपरेशन तयार करणे हे आरोपीच्या जवळच्या काही बीट रिपोर्टर्सचं काम आहे."
"तुम्ही हजारोंची फौज उभी करा, मी एकटी याला सामोरी जाईन कारण सत्य माझ्या पाठीशी आहे. माझ्या मनात त्यांच्याविरुद्ध कोणतीही नाराजी नाही. आरोपी खूप शक्तीशाली व्यक्ती आहे. मोठ मोठे नेतेही त्याला घाबरतात. त्याच्या विरोधात भूमिका घेण्याची कोणाची हिंमत नव्हती. मला कोणाकडून काही अपेक्षा नाही."
"दिल्लीच्या महिला मंत्री एका जुन्या महिला सहकाऱ्याचे चारित्र्य कसे हसत-हसत हायजॅक करत आहेत, हे पाहून वाईट वाटलं. मी माझ्या स्वाभिमानासाठी लढा सुरू केला आहे, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहीन. या लढ्यात मी पूर्णपणे एकटी आहे पण मी हार मानणार नाही" असं स्वाती मालीवाल यांनी म्हटलं आहे.
स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाण केल्याचा आरोप केला होता. यानंतर 'आप'ने हे भाजपाचे षड्यंत्र असल्याचं म्हटलं आहे. आपल्याला गोवण्याचा कट रचला जात असल्याची तक्रारही विभव कुमार याने पोलिसांत दाखल केली आहे. पोलिसांनी रविवारी (19 मे) विभव कुमारला अटक केली.