दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुरुवारी आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांचा जबाब नोंदवला आहे. मालीवाल यांनी आरोप केला आहे की, त्या 13 मे रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी गेल्या होत्या, जिथे केजरीवाल यांचे सहाय्यक विभव कुमार यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं आहे.
स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून यावर आता राजकारण करू नका असं सांगितलं आहे. "माझ्यासोबत जे घडलं ते खूप वाईट होतं. माझ्यासोबत घडलेल्या घटनेबाबत मी माझं स्टेटमेंट पोलिसांना दिलं आहे. मला आशा आहे की, योग्य ती कारवाई केली जाईल. मागचे काही दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले. ज्यांनी प्रार्थना केली त्यांचे मी आभार मानते."
"ज्या लोकांनी माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला, ही हे दुसऱ्या पक्षाच्या सांगण्यावरून करत आहे असं म्हटलं, देव त्यांनाही खूश ठेवो. देशात महत्त्वाच्या निवडणुका सुरू आहेत, स्वाती मालीवाल महत्त्वाच्या नाहीत, देशाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. भाजपावाल्यांना विशेष विनंती आहे की, या घटनेवर राजकारण करू नका" असं स्वाती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दिल्ली पोलिसांच्या दोन सदस्यीय पथकाने मध्य दिल्लीतील मालीवाल यांच्या निवासस्थानी त्यांचा जबाब नोंदवला. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मालीवाल यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, स्वाती मालीवाल यांचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस या प्रकरणासंदर्भात एफआयआर नोंदवू शकतात.
अतिरिक्त पोलिस आयुक्त (एसीपी) पीएस कुशवाह यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक चार तासांहून अधिक काळ मालीवाल यांच्या निवासस्थानी थांबले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मालीवाल सोमवारी सकाळी सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या होत्या आणि त्यांनी आरोप केला होता की, अरविंद केजरीवाल यांच्या स्टाफमधील एका सदस्याने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी गैरवर्तन केलं आहे.