ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सीमेपलीकडून पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार होत होता. पण गेल्या दोन महिन्यांपासून ही परिस्थिती निवळली आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारातही घट झाली आहे. हा गोळीबार थांबवण्यामध्ये मुख्य भूमिका निभावली आहे ती स्वातीने.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही स्वाती म्हणजे नेमकी कोण? तर ही स्वाती म्हणजे कुणी व्यक्ती नसून स्वाती हे भारताच्या एका रडार प्रणालीचे नाव आहे. स्वाती हे वेपन लोकेटिंग रडार नियंत्रण रेषेवर प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात येत आहेत. उल्लेखनीय म्हणजे ज्या भागातून गोळीबार होतो अशा ठिकाणाची अचूक माहिती या रडारमधून मिळते. त्यामुळे शत्रू सैन्याचा तोफखाना, मोर्टार आणि रॉकेट लॉन्चर उद्ध्वस्त करण्यासाठी मार्गदर्शन होते. तसेच आपल्या सैन्याकडून झालेल्या गोळीबारामुळे शत्रूसैन्य आणि त्यांच्या प्रदेशात पडलेल्या प्रभावाचा मागोवाही या रडार प्रणालीमधून मिळतो. त्यामुळे गेल्या काही काळात सीमेपलीकडून होणाऱा गोळीबार कमी झाला आहे. या संदर्भातील वृत्त नवभारत टाइम्सने प्रकाशित केले आहे.
नियंत्रण रेषेवर संहारक अवजड शस्त्रांच्या वापरावर बंदी आहे. पण सर्जिकल स्ट्राइकनंतर नियंत्रण रेषेवर गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यात वाढ झाली होती. मात्र त्याच दरम्यान, हे रडार सुरू झाले होते. त्यांना तत्काळ नियंत्रण रेषेवर तैनात करण्याता आले. या रडारच्या तैनातीनंतर गोळीबारात मोठ्या प्रमाणात घट झाली. आताही सीमेपलीकडून गोळीबार होतो, पण त्यातील घातक अस्त्रांचा वापर जवळपास थांबला आहे. दरम्यान डीआरडीओने विकसित केलेली ही रडारप्रणाली गुरुवारी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी लष्कराकडे सुपूर्द केली.