चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली :दिल्लीत मुख्यमंत्रिपदाचे नाव अद्याप निश्चित झाले नसले तरी नवीन मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तयारी सुरू झाली आहे. २० फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानात सायंकाळी साडेचार वाजता शपथविधी होईल. सोहळा भव्यदिव्य व्हावा, यासाठी पक्षाचे महासचिव विनोद तावडे आणि तरुण चूग यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची बैठक होत असून, यानंतर हे नेते शपथविधी सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह रालोआचे नेते, केंद्रीय मंत्री, उद्योगपती, बॉलिवूड कलावंत, क्रिकेटपटू आणि संत-महात्मे उपस्थित राहणार आहेत.
बुधवारी विधिमंडळ पक्षाची बैठक
दिल्ली भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बुधवारी होत असून, यात मुख्यमंत्रिपदासाठी नेत्याची निवड केली जाईल. यासाठी दोन निरीक्षक नेमण्यात आले आहेत.
हरयाणा-राजस्थान पॅटर्न?
भाजपने राजस्थान, हरयाणा, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री नेमताना प्रस्थापित नावे बाजूला ठेवत नवे चेहरे दिले. त्यामुळे दिल्लीतही हाच पॅटर्न असेल अशी शक्यता आहे.
हे आहेत दावेदार
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रवेश वर्मा, पक्षाचे माजी दिल्ली प्रदेशाध्यक्ष विजेंद्र गुप्ता आणि सतीश उपाध्याय यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. यातील वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून विजय मिळविला आहे.