पटना : देशभरात उकाड्याने हैराण केलेले असताना बिहारमधून आश्चर्यकारक माहिती मिळत आहे. उकाड्याने नागरिक त्रस्त असताना आता गणपती बाप्पाही कमालीचे हैराण झाले आहेत. गया जिल्ह्यातील रामशीला डोंगरावरील मंदिरातील गणेश मूर्तीमधून घाम फुटू लागल्याची घटना समोर आली आहे. मंदिराच्या पुजाऱ्याने तर उकाड्याने बाप्पाही त्रस्त असल्याचा दावा केला आहे. त्यांना थंड वाटण्यासाठी चंदनाचा लेप आणि पंखे लावण्यात आले आहेत.
गणेश मूर्तीला पुजाऱ्यांनी चंदनाचा लेप लावला आहे. तसेच मूर्तीसमोर दोन पंखेही लावले आहेत. मूर्तीची वस्त्रेही उष्णतेला लक्षात घेऊन बनविण्यात आली आहेत.
हे मंदिर भगवान राम यांच्याशी संबंधीत आहे आणि गयामध्ये होणाऱ्या पितृपक्ष मेळ्याच्या दुसऱ्या दिवशीच पिंडदान या मंदिरात केले जाते. श्री रामही पिंडदान करण्यासाठी या ठिकाणी आले होते, असे मानले जाते. यामुळे या ठिकाणी रामशीला डोंगर, ठाकुरवाडी आणि राम सरोवर निर्माण झाली आहेत.
हे आहे वैज्ञानिक कारणमूर्तीतून पाणी निघण्यामागे वैज्ञानिक कारणेही आहेत. या मंदिरातील गणेश मूर्ती मुंगा दगडामध्ये कोरण्यात आली आहे. या दगडाची प्रवृत्ती उष्ण असते, यामुळे उष्णता वाढल्यास या दगडातून आपोआप पाणी बाहेर पाझरायला लागते. गेल्या काही वर्षांपासून या मंदिरात हा प्रकार होत आहे. गयामध्ये सध्या पारा 45 अंशांवर पोहोचला आहे.
आजपर्यंतच्या अफवाकाही वर्षांपूर्वी गणपती बाप्पा दूध पित असल्याच्या अफवा उठल्या होत्या. यामागेही वैज्ञानिक कारण होते. मूर्ती आतून पोकळ असल्याने ती पोकळी दूध शोषून घेते, असे तज्ञांनी सांगितले होते. यानंतर पावसाळ्यात गणेश चतुर्थीवेळी सजावटीच्या चादरमधून तीर्थ येत असल्याची अफवा पसरली होती. यामागेही कारण होते. चादर नवीन असल्याने ती मीठाच्या पाण्यात भिजवलेली असते. ही चादर हवेतील आर्द्रता शोषून घेत असल्याने त्याचे रुपांतर पाण्यात होत होते. महत्वाचे म्हणजे हे पाणी खारे लागत होते.