कोलकाता : संपूर्ण जगात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. मात्र, असे असतानाच मिठाईसाठी प्रसिद्ध असलेल्या पश्चिम बंगालमध्ये चक्क कोरोना मिठीईच बाजारात विक्रीसाठी आली आहे. कोलकात्यातील एका मिठाईच्या दुकानदाराने कोरोना व्हायरससारखी दिसणारी मिठाई तयार केली आहे. अनेक ग्राहक हिच्या आकाराचे कौतुक करत आहे. तर अनेक जण ही मिठाई चव चाखण्यासाठी विकत घेत आहेत.
संबंधित दुकानाच्या मालकाला जेव्हा यासंदर्भात विचारण्यात आले, तेव्हा कोरोनाव्हायरसमुळे अनेकजण मृत्यूमुखी पडत आहेत. मात्र आम्ही, अशी मिठाई तयार करून लोकांच्या मनात असलेली कोरोनाची भीती कमी करण्याचे काम केले आहे. आम्ही कोरोनासोबत लढू आणि तो पचवूही, असा संदेश ही मिठाई लोकांना देत आहे, असे ते म्हणाले.
चार तासांसाठी खुली राहणार मिठाईची दोकाने -
दुधाची होत असलेली नासाडी लक्षात घेत, काही वेळासाठी मिठाई दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी 'पश्चिम बंगाल मिठाई व्यवसायीक समिती'सह अनेक संघटनांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडे केली होती. यानंतर सरकारने काही अटींवर रोज केवळ 4 तासांसाठीच ही दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. या नुसार ही दिकाने दुपारी केवळ 12 ते 4 या वेळेतच खुली ठेवता येणार आहेत.
कोरोनाने पश्चिम बंगालमध्येही रातपाय पसरायला सुरुवात केली आहे. ममता बॅनर्जी यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, तेथे आतापर्यंत एकूण 61 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, यातील 55 जण सात कुटुंबातील आहेत.