हैदराबाद : देशात आणीबाणी लागू करून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी चूक केली. कारण आणीबाणीमुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना लोकशाहीची झूल पांघरून भारताच्या मुख्य राजकीय प्रवाहात येऊ शकली. आणीबाणीचा हाच खरा विघातक परिणाम आहे, असे परखड मत ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केले.वृत्तंसस्थेला दिलेल्या मुलाखतीत आपले व्यक्तिगत मत मांडताना रमेश म्हणाले की, आणीबाणीमुळे देशातील संसदीय लोकशाहीचा गळा घोटल्याचे दूषण काँग्रेसवर आले व जे मुळात लोकशाहीवादी नाहीत अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यासारख्या लोकांना लोकशाहीची झूल पांघरून राजकारणात येण्याचा मार्ग मोकळा झाला.त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघास राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हाही आणीबाणीचा घातक परिणाम ठरला. भारतीय जनता पार्टीसारख्या पराकोटीच्या असहिष्णू लोकांना लोकशाहीवादी म्हणून मिरविणेही आणीबाणीमुळेच शक्य झाले, असेही काँग्रेसचे राज्यसभा सदस्य असलेले रमेश म्हणाले.आणीबाणी लागू करण्यामागची पर्स्थििती काय होती हा इतिहास जरी बाजूला ठेवला तरी आणीबाणी लागू करणे चुकीचे होते असेच म्हणावे लागेल. कारण ज्या काँग्रेस पक्षाने देशात संसदीय लोकशाही रुजवली तोच पक्ष लोकशाहीचा मारक म्हणून बदनाम झाला व जी मंडळी मुळात कधीच लोकशाहीवादी नव्हती अशांना लोकशाहीवादी म्हणून वावरण्यास वाव मिळाला.त्यामुळे या दृष्टीने विचार करता आणीबाणी लागू करणे ही इंदिरा गांधीची चूक झाली, असे म्हटले तरी अखेर नेहरुवादी विचारसरणीच वरचढ ठरली, असे रमेश यांचे म्हणणे होते.ते म्हणाले की, ज्या इंदिराजींनी आणीबाणी लादली त्यांनीच आणीबाणीचा फैसलाही केला. इंदिराजींवरील नेहरुवादी विचारांचा पगडाच अखेर वरचढ ठरला. म्हणूनच त्यांनी १९७७ मध्ये स्वत:हून आणीबाणी उठवून निवडखुका जाहीर केल्या. एवढेच नव्हे तर त्यांनी जनतेचा कौलही शिरसावंद्य मानला.ज्या मतदारांनी १९७७ मध्ये उंदिरा गांधींना नाकारले त्यांनीच १९८० मध्ये त्यांना पुन्हा सत्तेवर आणले. हेच तर लोकशाहीचे खरे बळ आहे, असेही रमेश म्हणाले. (वृत्तसंस्था)
आणीबाणीमुळेच संघावर चढली लोकशाहीची झूल
By admin | Published: October 21, 2015 4:26 AM