प्रसन्न पाध्ये, घुमान (संत नामदेवनगरी) मराठी भाषेचा उत्सव म्हटल्या जाणाऱ्या साहित्य संमेलनाच्या ठरावातही घुमानचा गजर झाला. अर्ध्याहून अधिक ठराव घुमान, पंजाबचे मुख्यमंत्री आणि संत नामदेवांसंदर्भात होते. घुमानचे नाव बदलण्याचाही ठराव महामंडळाने मांडला. मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास याकडे ठरावात दुर्लक्ष झाले. संमेलन पंजाबबाहेर घुमानला होत असल्यान अगोदरच टीका झाली होती. ठराव वाचनात ही टीका अधोरेखित झाली अशी चर्चा संमेलनानंतर सुरू झाली आहे. एकूण १५ ठराव करण्यात आले आहेत. पहिला ठराव हा दिवंगतांना श्रद्धांजली वाहणारा आहे. घुमान हे उत्तर भारतीयांचे पंढरपूर झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने घुमानला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. घुमान हे गाव संत नामदेव महाराजांचे कार्यक्षेत्र आणि त्यांच्या वास्तव्याने पुनित झाले आहे. त्यामुळे या नगरीचे नाव ‘बाबा नामदेव नगरी घुमान’ करावे, असाही ठराव महामंडळाने केला.महाराष्ट्रातील पंढरपूर हे विठ्ठल भक्तांचे स्थान आहे, तसेच पंजाबमधील घुमान हे नामदेव भक्तांचे आदराचे स्थान आहे. त्यामुळे पंढरपूर ते घुमान अशी ‘नामदेव एक्स्प्रेस’ तर ‘नांदेड ते अमृतसर’ अशी विमान सेवा सुरू करावी, असा ठराव करण्यात आला. मराठी भाषा आता सर्वांगाने परिपूर्ण व समृद्ध झाली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्व निकष पूर्ण केले आहेत. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी करणारा ठराव करण्यात आला. त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाची ओढ वाढल्याने मायमराठीची उपेक्षा होऊ नये यासाठी इंग्रजीसह सर्व मराठी शाळांत पहिलीपासून मराठी विषय शिकविला जावा, अशी मागणीही करण्यात आली.
महामंडळाच्या ठरावातही घुमानचाच गजर
By admin | Published: April 06, 2015 2:59 AM