सुधीर लंके , घुमान (पंजाब)या वर्षीचे मराठी साहित्य संमेलन मराठी माणसापेक्षा पंजाबी माणूसच साजरे करतोय. संमेलनासाठी घुमान तर नटले आहेच, पण संत नामदेवांच्या या कर्मभूमीला ‘पवित्र शहर’ असा दर्जा देण्याची तयारीही पंजाबच्या प्रकाशसिंग बादल सरकारने सुरू केली आहे. असे झाले तर संत नामदेवांचा तो मोठा गौरव ठरेल व घुमान उत्तरेचे पंढरपूर बनेल. मायमराठीच्या विजयाची ती एक नवी गाथा असेल ! नामदेवांनी पंढरपूरच्या भक्ती मार्गाची लाट पंजाबात नेली. शीख धर्माच्या गुरुग्रंथसाहिब या ग्रंथात या संतकवीची ६१ पदे आहेत. त्यामुळे मराठी माणसापेक्षाही पंजाब नामदेवांवर नितांत प्रेम करतो व त्यांच्या ‘बाणी’त दंग होतो, हे घुमानमध्ये फिरताना पदोपदी दिसते. मराठी पाट्या हाती घेऊन घुमानची माणसं महाराष्ट्राच्या आगमनाची वाट पाहात आहेत. पुण्याची ‘सरहद’ संस्था संमेलनाची मुख्य संयोजक आहे. घुमान हे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र जाहीर करावे, अशी मागणी संस्थेचे संजय नहार यांनी वेळोवेळी केलेली आहे. त्या दृष्टीने काही आशादायक पावले संमेलनानिमित्त पडत आहेत. केंद्र सरकारने याबाबतचा निर्णय पंजाब सरकारवर सोपविला आहे. पंजाब सरकारने याबाबतचा प्रस्ताव तयार केल्याचे सरकारचे अतिरिक्त प्रधान सचिव सुरेश कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, की महाराष्ट्र घुमानकडे एवढ्या आशेने बघतो आहे तर पंजाब नक्की काहीतरी करेल. पंजाबमध्ये एखाद्या स्थळाला राष्ट्रीय दर्जा देण्याची प्रथा नाही. परंतु अमृतसरच्या धर्तीवर हे शहर ‘पवित्र शहर’ म्हणून जाहीर होऊ शकते. तसाप्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी तशी घोषणा करू शकतात.
घुमानला ‘पवित्र’ दर्जा देणार
By admin | Published: March 30, 2015 2:09 AM