भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा वेग ४० टक्क्यांनी मंदावला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. भारताच्या या निर्णयाचे जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे कौतुक केले आहे. भारताकडे प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे कोरोनाला रोखणं आता तुमच्या हाती आहे असं मत WHOचे कार्यकारी संचालक मायकल जे रायन यांनी व्यक्त केलं होतं. तसेच आता स्वित्झर्लंडनेही भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईचे कौतुक केले आहे.
स्वित्झर्लंडने आल्प्स पर्वतरांगेतील मॅटरहॉर्न पर्वतावर भारतीय तिरंगा झळकवून कोरोनाविरोधात भारताच्या लढ्यात भारताशी एकता व्यक्त केली आहे. भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी गुरलीन कौर यांनी ट्विटरवर फोटो शेअर करुन यासंबंधित माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करुन जग कोरोनाविरुद्धच्या लढाईत एकत्रपणे लढत आहे. कोरोनाच्या महामारीवर मानवजाती नक्की विजय मिळेल अशी आशा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
देशभरात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. कोरोना व्हायरसने संक्रमित होण्याचा वेग 40 टक्क्याने कमी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या आताच्या घडीला 13 हजार 835 आहे. तर, आतापर्यंत 452 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. मागील सात दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग तीन दिवस होता. मात्र, आता त्यात घट होऊन तो 6.1 दिवस झाला आहे. त्यामुळे भारतीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, देशात १,९१९ रुग्णालये कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सज्ज आहेत. १ लाख ७३ हजार खाटा तयार आहेत. २१ हजार ८०० आयसीयू कक्ष उभारण्यात आले असल्याने भारत दिवसेंदिवस तयार होत आहे. आतापर्यंत देशात लाख १९ हजार ४०० जणांची चाचणी करण्यात आली आहे.