नवी दिल्ली - भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी (Syama Prasad Mukherjee) यांची आज पुण्यतिथी. आजच्याच दिवशी 23 जून 1953 रोजी जम्मू काश्मीरमधील एक कारागृहात त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॉंग्रेसवर अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, कॉंग्रेस पक्षातील लोकांची कोणतीही चौकशी केली नाही. या बरोबरच जे.पी.नड्डा यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या आईच्या पत्राचा उल्लेखही केला. जे पत्र त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना लिहिले होते. या पत्रात त्यानी नेमके काय लिहिले होते?
30 जून 1953 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या आई जोगमाया देवी यांना पत्र लिहून शोक व्यक्त केला होता. यानंतर 4 जुलैला जोगमाया देवी यांनी त्या पत्राला उत्तर दिले होते. या पत्रात त्यांनी लिहिले आहे, की कुठल्याही खटल्याशिवाय माझ्या मुलाचा अटकेतच मृत्यू झाला. आपण म्हणता, की माझा मुलगा अटकेत असताना आपण काश्मीरला गेला होता. आपण त्यांच्या प्रति आपल्या प्रेमाबद्दल बोलता.
जोगमाया देवी यांनी पत्रात लिहिले होते, की मला आश्चर्य वाटते, की आपल्याला त्यांची वैयक्तिक भेट घेण्यापासून आणि त्यांच्या आरोग्याबद्दल तसेच व्यवस्थेबद्दल विचारण्यापासून कुणी रोखले. त्यांच्या अटकेनंतर मला, त्यांच्या आईला, जम्मू-काश्मीर सरकारकडून पहिला संदेश मिळाला, की माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. किती क्रूर पद्धतीने संदेश देण्यात आला?
भाजप अध्यक्षांचे काँग्रेसवर आरोप -भाजप अध्यक्ष नड्डा म्हणाले, जम्मूमध्ये प्रवेश करत असताना डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना अटक करण्यात आली होती आणि या घटनेमुळे देशभरात निदर्शनं झाली. डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या अटकेनंतर 40 दिवसांनी सरकारी रुग्णालयात त्यांचे रहस्यमय परिस्थितीत निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र, तत्कालीन नेहरू सरकारने डोळेझाक केली. डॉ. मुखर्जी यांच्या आई योगमाया देवी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहून मुलाच्या रहस्यमय मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती.
जेपी नड्डा म्हणाले, श्यामा प्रसाद यांच्या आईने पंडित नेहरूंना पत्र लिहिले होते आणि मला खोटे युक्तिवाद ऐकण्याची इच्छा नाही. मला चौकशी हवी आहे आणि चौकशी झालीच पाहिजे, असे म्हटले होते. परंतु, कॉंग्रेसच्या लोकांनी हे प्रकरण दाबले. नड्डा म्हणाले, की त्यांनी स्पष्ट शब्दात आरोपच केला होता, की जम्मू-काश्मीर सरकारने आमच्या मुलाची रहस्यमय पद्दतीने हत्या केली आहे आणि आपण त्यावर पांघरूण घालत आहात.